“आरक्षण प्रश्न”

तत्कालीन धर्म नि समाजव्यवस्थेने ज्या शुद्र म्हणून गणलेल्या समूहाला शिक्षण, व्यवसाय, नोकरी, नाकारुन असमानतेवर आधारित सामाजिक व्यवस्थेत कुजवत ठेवून त्यांना मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित ठेवून संधीच नाकारली अशा मागासवर्गीय समूहासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची घटनात्मक तरतूद केली.प्रश्न आरक्षणाचा कधीच नव्हता प्रश्न होता तो खाली बसणारा उद्या वरती बसणार होता.मराठा समाजासाठी असलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने याच मुद्द्यावर बेकायदेशीर ठरवले कि तुम्ही सामाजिक मागास कसं काय आहात हे सिध्द करा, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणासाठी आर्थिक निकष सर्वोतोपरी गणला नव्हता सामाजिक परिस्थिती हाच निकष मुख्य होता, मागासवर्गीय समूहाला आरक्षण मिळाले म्हणजे ते धनदांडगे,सधन झाले असं आपण ठामपणे सांगू शकतो का कारण खरी परिस्थिती लक्षात घेता या वर्गातील बहुसंख्य लोक आजही छोटी मोठी काम करुनच आपला उदरनिर्वाह करतात दोन चार टक्के लोकच याचा फायदा उचलतात.
मराठा समाजातील बहुसंख्य प्रस्थापित जो आहे त्याच्या आज शैक्षणिक, सहकारी, संस्था आहेत विधीमंडळात बरेचसे लोकप्रतिनिधी निवडून येतात,मग हा वर्ग सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे कोणत्या निकषांवर ठरवता येईल ?
तरीही मराठी समाजातील बहुसंख्य लोक आज आर्थिकदृष्ट्या मागास आहेत हे वास्तव नाकारून चालत नाही,याचे कारण म्हणजे यांनीच निवडून दिलेले प्रस्थापित राजकारणी त्यांनी प्रत्येक वेळी फक्त आरक्षणाच गाजर दाखवलं आणि आपली नैतिक जबाबदारी साफ टाळली, आणि मुख्य प्रश्न हा आहे कि जरी मराठी समाजाला आरक्षण टिकणार आरक्षण मिळालं तर त्याचा फायदा खरोखरच या वंचित उपेक्षित मराठा समाजातील युवकांना होईल का ?

प्रस्थापित राजकारणी तिथही याचा लाभ घेतील हे वास्तव आहे.मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास होण्याचं प्रमुख कारण म्हणजे यातील बहुतेक जण शेतीशी निगडित काम करतात पण निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीला मोठा फकटा बसत आहे,खतांचे भाव शेतकऱ्यांना न परवडणारे आहेत शेतीमालाला योग्य भाव नाही तसेच वाढत्या कुटुंब व्यवस्थेमुळे पाच पन्नास एकर शेती एक दोन एकरांवर येऊन सधन असलेला शेतकरी आज अल्पभूधारक झाला आहे,तसेच खाजगीकरणाच्या या रेट्यात आरक्षणाचा लाभ मिळणार कसा ? कारण खाजगी नोकरीत आरक्षण नसणार आहे.त्यामुळे मराठा समाजातील लोकप्रतिनिधी असो वा ईतर सधन लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असो यांनी या वर्गासाठी कृषी क्षेत्राशी निगडीत महाविद्यालयात जास्तीत जास्त या युवकांना विविध योजना राबवून यांना अर्थसहाय्य करुन शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित करुन चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली पाहिजे तसेच व्यावसायिक शिक्षणातही यांना विविध कौशल्ये आत्मसात करुन देऊन स्वताचा व्यवसाय उभारण्यासाठी भक्कम अशी आर्थिक तरतूद केली पाहिजे फक्त जाहिरात बाजी करुन पुरेसं होत नाही.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो सारथी असो,या मार्फत मराठा समाजातील युवकांना शिक्षणासाठी व ईतर उद्योगासाठी निधी दिला जातो तो खरोखरच यांना मिळून फायदा होतोय का याचाही शासनाने पाठपुरावा करणं गरजेच आहे त्यामुळे आरक्षण प्रश्न हा निकालात काढण्यासाठी सरकारने मागासलेपण सिध्द करणे अत्यंत आवश्यक आहे,व त्यादृष्टीने सरकारने प्रयत्न करुन घटनेमध्ये टिकेल व इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळवून दिलं पाहिजे व शासनाच्या विविध योजना, महामंडळ यांच्यामार्फत ही युवकांना विकास करुन घेण्यासाठी सर्वोतोपरी मदत करावी व फक्त आश्वासन न देता त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे.
✍️ समाधान दणाने, करमाळा, मो. 7218844652

