ग्रामपंचायत निवडणूक पार पाडणाऱ्या शिक्षकांना भत्ता मिळावा – विजयकुमार गुंड
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुका ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 करिता तालुक्यातील 15 ग्रामपंचायतची निवडणूक दिनांक ५ नोव्हेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीच्या मतदान केंद्रावर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अधिकारी व कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांची 2 प्रशिक्षणे व प्रत्यक्ष मतदानाचा 1 दिवस असे 3 दिवसांचे कामकाज निवडणूक कामी पार पडले आहेत. मात्र सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक यशस्वी पार पाडल्या नंतर ही शासकीय नियमातील तरतुदीप्रमाणे भत्ता मिळालेला नाही.
निवडणूक कार्मचाऱ्यांना भत्ता न मिळाल्याने शिक्षक भारती संघटनेने तहसीलदार करमाळा यांना निवडणूक भत्ता मिळावा व रविवार सुट्टी दिवशी कर्तव्य काळ काम केल्याने एक दिवसाची बदली रजा मिळावी या विषयाचे निवेदन सादर केले आहे. शिक्षक भारतीचे करमाळा तालुका अध्यक्ष व जिल्हा प्रवक्ता श्री विजयकुमार गुंड यांनी याविषयीचे निवेदन नायब तहसीलदार श्री काझी यांना दिले आहे.
तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी निधी उपलब्ध नसल्याने भत्ता दिला नसल्याचे यावेळी सांगितले. लवकरच निधी उपलब्ध झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना भत्ता दिला जाईल असे आश्वासन यावेळी मिळाले.