येत्या अधिवेशनात महिला आमदारांनी विधवा प्रथा निर्मूलन कायदा आणण्यासाठी प्रयत्न करावेत – प्रमोद झिंजाडे
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – येत्या ०७ डिसेंबर २०२३ पासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभा व विधानपरिषद महिला आमदारांनी शून्य प्रहारात प्रश्न उपस्थित करून विधवा प्रथा निर्मूलन कायदा करण्याबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या प्रेसनोट मध्ये ते म्हणाले की, गेल्या वर्षी नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानपरिषद सदस्य आमदार रामराव पाटील यांनी लक्ष वेधी सुचना मांडली होती. मा. उपाध्यक्षा विधानपरिषद. महाराष्ट्र राज्य. आदरणीय निलमताई गोरे यांनी स्वीकृत केली.मा उप मुख्यमंत्री. श्री.देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या संदर्भात या तिन्ही मान्यवरांचे मनापासून अभिनंदन. मात्र महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता मुळे हा महत्त्वाचा विषय दुर्लक्षित झाला आहे. १७ मे २०२२ चे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार हेरवाड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद मार्फत प्रत्येक गावात ग्रामसभेत ठराव मंजूर करून प्रचार प्रसार करण्याबाबत अनेक गावातील पुढाकार घेऊन ही अनिष्ट क्रूर प्रथा नष्ट करणेबाबत यशस्वी झालेत. याची दखल गोवा सरकारने घेऊन गेल्या वर्षी दोन्ही सभागृहात या विषयावर चर्चा होऊन कायदा करण्याबाबत कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. हेरवाड पॅटर्न संपूर्ण जगात चर्चेत आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. आता बाकी आहे तो कायदा करण्याबाबत अधिवेशनात शून्य प्रहारात प्रश्न उपस्थित करून गती देण्याचा. मी दोन्ही सभागृहातील सर्व महिला आमदारांना कळकळीची विनंती करतो. आपण राजकीय पक्ष बाजूला ठेवून या विषयावर सर्व महिला आमदारांनी एकी करून ही समस्यांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आवाज उठवावा ही विनंती.
याविषयीचे निवेदन आम्ही विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व महिला आम दारांना देणार असल्याचे विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियानाचे सदस्य राजू शिरसाठ (नाशिक) यांनी सांगितले.