ऊसतोड मजूर देतो असे म्हणून 12 लाख रुपयांची फसवणूक – मुकादमावर गुन्हा दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.६) : 14 उसतोड कोयते मजुर पुरवतो असे म्हणुन एका ऊसतोड मजूर मुकादमाने 12 लाख रुपये घेवून मजूर न देता फसवणूक केल्याची घटना घडली आहे, यात सदर मुकादमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विठोबा पोपट कोकरे (वय 37) रा.उंदरगाव ता.करमाळा जि.सोलापुर यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले कि, मी सन 2023-2024 साला करीता उसतोडी मुकादम सागर राम गायकवाड रा.अशोक नगर, ता.श्रीरामपुर जि. अहमदनगर यांचे संपर्क साधला व त्यांनी मला उसतोडी करीता मजुर देतो असे म्हणुन मी तुम्हाला माझे ओळखीचे 14 उसतोड कोयते मजुर पुरवतो असे म्हटले व 20 मार्च 2023 रोजी साक्षीदार समक्ष नोटरी करुन 12 लाख रुपये दिले.
त्यानंतर साखर कारखाने चालु झाले, नंतर आम्हाला कारखान्यांनी उसतोड मजुर आणण्याकरीता तारखा दिल्याने सागर गायकवाड यांच्याकडे उसतोड मजुर आणण्या करीता गेलो असता ते मला म्हणाले कि, मी तुम्हाला उसतोड मजुर देतो, तुम्ही एक ते दोन दिवस थांबा असे म्हणाल्याने मी त्यांना ठिक आहे असे म्हणाले होते नंतर मी त्यांना वारंवार फोनद्वारे उसतोड मजुरांची मागणी केली असता त्यांनी मला उसतोड मजुर देण्यास टाळाटाळ केली व माझे चालु सिजनचे पैसे देखील परत देण्यास टाळाटाळ करण्यास सुरूवात केली.
मी त्यांना वारंवार तुम्ही उस तोड मजुर पाठवा नाही तर माझे पैसे तरी मला परत दया असे म्हणाल्याने ते उडवा उडवीची उत्तरे देत होते. त्यानंतर त्याने तुमचे पैसे आम्ही देत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणुन फोन बंद केला, त्यानंतर माझी खात्री झाली कि सागर राम गायकवाड याने माझी 12 लाख रुपयाची फसवणुक केलेली आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.