'चिखलठाण'चे निकिता व श्रेयश शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत देशात प्रथम.. - Saptahik Sandesh

‘चिखलठाण’चे निकिता व श्रेयश शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत देशात प्रथम..

कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे…

कंदर : भोपाळ येथे 26 डिसेंबर 2023 ते 01 जानेवारी 2024 या दरम्यान संपन्न झालेल्या शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये चिखलठाण (ता.करमाळा) येथील सर्वसामान्य कुटुंबातील कु.निकिता अमोल रोकडे व चि.श्रेयश अमोल रोकडे या दोघा बहिण भाऊंनी राष्ट्रीय स्पर्धेत आपला दबदबा कायम करत सुवर्णपदक पटकावले आहे.

रायफल शूटिंग खेळ हा अतिशय महागडा खेळ असून, तो सर्वसामान्यांच्या अवक्या बाहेरचा आहे. परिस्थिती वरती मात करत या दोन्ही खेळाडूंचे नेवासा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालयातून शालेय स्तरावरून महाराष्ट्र संघात निवड झाली व भोपाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत ते सहभागी झाले. कुमारी निकिता अमोल रोकडे हिने 19 वर्ष वयोगटात 10 मी ओपन साईट खेळ प्रकारात टीम सुवर्णपदक पटकावले.

श्रेयश अमोल रोकडे याने 17 वर्ष वयोगटात दहा मीटर ओपन साईट खेळ प्रकारात टीम सुवर्णपदक पटकावले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधून 1200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या यशस्वी खेळाडूंना त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील, अध्यक्षा श्रीमती सुमतीताई घाडगे पाटील, उपाध्यक्षा स्नेहलताई चव्हाण घाडगे पाटील सचिव मनीष घाडगे पाटील, प्राचार्य सोपानराव काळे, रायफल शूटिंग प्रशिक्षक छबुराव काळे, श्रीमती सुनिता काळे, अमोल रोकडे आदींनी शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!