उजनी धरणग्रस्तांचे १ फेब्रुवारीला भिगवण येथे रास्ता रोको आंदोलन - Saptahik Sandesh

उजनी धरणग्रस्तांचे १ फेब्रुवारीला भिगवण येथे रास्ता रोको आंदोलन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – उजनी धरणाची पाणी पातळी मायनस मध्ये गेली असताना सुद्धा नियम धाब्यावर बसवून पाणी खाली सोडण्यात येत आहे. हे पाणी सोडणे तात्काळ बंद करावे. या मागणीसाठी करमाळा ,इंदापूर, कर्जत व दौंड तालुक्यातील धरणग्रस्त नागरिक एकत्रित येत येत्या गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी भिगवण (ता.इंदापूर) येथे सागर हाॅटेल समोर सकाळी 11 वाजता राष्ट्रीय महामार्ग अडवत आंदोलन करणार आहेत. हा रास्ता रोको यशस्वी करण्याच्या पार्श्वभूमीवर जलाशय काठावरील नागरिक गावोगावी बैठका घेऊन भिगवण ला जाण्याचे नियोजन करीत आहेत.

काल (दि.२९) वांगी नं 1 येथे सायंकाळी पाच वाजता नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत वांगी परिसरातील ढोकरी,भिवरवाडी ,बिटरगाव, वांगी नं 1, 3, 4,नरसोबावाडी पांगरे, आदी गावातून पन्नास ते साठ चार चाकी वाहनातून शेकडो लोक जाणार असल्याचा निर्धार करण्यात आला. आज (दि.३०) कंदर पंचक्रोशीतील नागरिकांची सकाळी 9 वाजता बैठक आयोजित केली आहे.

मागील आठवडय़ात धरणग्रस्तांनी सोलापूर च्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन धरणग्रस्तांनी निवेदन दिले होते परंतु त्याचा उपयोग झाला नाही. कॅनाल चे पाणी खाली सोडणे सुरूच आहे. त्यामुळे धरणग्रस्तांनी आक्रमक होत रस्ता रोको आंदोलन हाती घेतले आहे.

यावर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने उजनी धरण केवळ 60.66 % एवढेच भरले असताना उजनी च्या पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही. गरज नसताना वारेमाप पाणी खाली सोडण्यात आले.परिणामी उजनी जानेवारीतच मायनस मधे गेले. आता पुढचे सहा महिने कसे जाणार या भिती ने उजनी जलाशय काठावरील नागरिक भयभीत झाले आहेत. नोव्हेंबर डिसेंबर पासून पाण्याचे योग्य नियोजन करा असा आर्त टाहो फोडणाऱ्या धरणग्रस्तांकडे कुणी ही लक्ष दिले नाही. उलट खाली पाणी सोडण्याची जणू स्पर्धाच लागली. यामुळेच संतापलेल्या धरणग्रस्तांनी आता तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

वांगी क्र.१ येथील बैठकीस उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती चे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर, उपाध्यक्ष भारत साळुंके ,भा ज पा चे नूतन जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील,मकाई चे संचालक सचिन पिसाळ, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके ,वांगी ग्रामपंचायतीचे सदस्य दत्ताबापू देशमुख, तानाजी देशमुख,सोसायटीचे संचालक विकास पाटील, सुधीर देशमुख, रावसाहेब देशमुख, देवा तळेकर, नवा शिनगारे,पैलवान शिवाजी खरात,भारत सलगर,गणेश खरात,विष्णुपंत वाघमारे,बाळू महानवर, दादा भोसले ,आबा सरडे, वैभव पाटील, गणेश पाटील, भारत रोकडे,चंद्रकांत राम अण्णा देशमुख, आदि बहुसंख्येने उपस्थित होते.

Related News : उजनीत तात्काळ १० टीएमसी पाणी वरील धरणातून सोडावे धरणग्रस्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!