जगताप विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ४२ वर्षांनंतर संपन्न
करमाळा,ता.९: येथील कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या १९८१-८२ साली दहावीत असलेल्यां वर्गमित्र – मैत्रिणीचा तब्बल ४२ वर्षांनंतर स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. हाॅटेल राजयोग येथे हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्याची सुरुवात गुरूजनांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. उपस्थितांचे स्वागत महादेव यादव यांनी केले.प्रथमतः दिवंगत शिक्षक आणि वर्गमित्र – मैत्रिणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.
आपण शालेय वर्गमित्र-मैत्रिणींनी एकत्र आलं पाहिजे असं काही जणांना १-२ वर्षांपासून प्रकर्षाने वाटंत होतं. डॉ पंकज गांधी यांनी पुढाकार घेऊन ‘जगताप विद्यालय बॅचमेट्स’ हा व्हाॅट्सअप ग्रुप फाॅर्म केला. महादेव यादव आणि राजेंद्र माने यांनी जगताप विद्यालयातून १९८१ – ८२ सालचे दहावीच्या वर्गाचे हजेरीपत्रक मिळवले. एकमेकांच्या संपर्कात असलेल्या मित्र-मैत्रिणींच्या माध्यमातून इतर मित्र मैत्रीणींचे नंबर मिळवून त्यांना ग्रुपमध्ये सामील केले गेले.
करमाळा येथे पहिला स्नेहमेळावा आयोजित करण्यात यावा आणि त्यामध्ये गुरूजनांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान करावा असे निश्चित झाले. संयोजनासाठी करमाळा व पुणे येथे बैठका घेण्यात आल्या. करमाळ्यातील जब्बार खान, राजेंद्र माने, दिपक ओहोळ, दिगंबर देशमुख, तसेच पुणे स्थित डॉ पंकज गांधी रवींद्र डवरे, उध्दव आमरुळे, चंदा संचेती, लतिका आगरवाल बैठकीत सहभागी होते.
या स्नेहमेळाव्याची सुरवात कु. प्रांजल सुराणा हिने सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. डॉ पंकज गांधी यांनी केलेल्या प्रास्ताविकानंतर उपस्थित गुरुजनांचा सन्मान शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला. यानंतर राजेंद्र माने, दिपक ओहोळ, प्रवीण शहाणे, मंदाकिनी धाकतोडे, चंदा संचेती(शहा),लता वीर(शिंदे), विजया क्षिरसागर (उबाळे),उज्वला मुनोत(कटारिया), लता फंड (पवार), संगीता राठोड, जालिंदर जाधव, दिगंबर देशमुख व इतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या व शिक्षकांच्या आठवणींना उजाळा देऊन शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. मेळाव्यास उपस्थित तत्कालीन मुख्याध्यापक गुलाबराव बागल सर, तसेच अर्जून फंड सर, रमेश कवडे सर, लालासाहेब जगताप सर, कलाशिक्षक घोडके सर व शेळके सरांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांबाबतच्या आठवणींना उजाळा देऊन कौतुक केले.
१९८२ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या या बॅचचा निकाल ७६ टक्के लागला होता आणि त्यानंतर विद्यालयची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली. खेळांमधेही विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केले होते त्यामुळे तुमची बॅच आमच्यासाठी विशेष असल्याचे प्रतिपादन कवडे सर आणि बागल सरांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं. राजकुमार सुराणा यांनी विनोदाची पेरणी करत केलेल्या खुमासदार सुत्रसंचलनाने मेळाव्यात रंगत आणली. आभार प्रदर्शन चंदा संचेती(शहा) यांनी केले.
मेळावा यशस्वी होण्यासाठी जब्बार खान,संजय देवी, राजेंद्र माने, दिगंबर देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.