केमचे सौभाग्यचं लेण - कुंकू - Saptahik Sandesh

केमचे सौभाग्यचं लेण – कुंकू

केम(संजय जाधव)करमाळा तालुक्यात केम गावात रेल्वे स्टेशन असले तरी ते गाव तसे आडवळणाचे. अरुंद रस्ते आणि राज्य परिवहन मंडळाची बस दिवसातून वीस वेळा,ये,जा करतात . बाकी केमबाहेर जायचे तर खासगी वाहनाचा वापर करावा लागतो. साधारण बारा हजार लोकसंख्या. गावात सतरा सदस्यांची ग्रामपंचायत आहे.

गावात कुंकू बनवण्याचा खूप जुना उद्योग आहे. पूर्वी कुंकू बैलगाडीतून पंढरपूरच्या बाजारात नेले जाई. स्वातंत्र्यानंतर काही काळ भारतीय रेल्वेच्या वॅगन केमला उभ्या राहत आणि साऱ्या देशभर केमचे कुंकू पोचवत असत. केम गावात लहानमोठे पंचवीस कारखाने आहेत. दीडशे-दोनशे वर्षांची परंपरा असणारे काही कुंकू उत्पादक केममध्ये आहेत. केमचे कुंकू म्हणजे हळदीपासून तयार केलेले कुंकू अशी ग्राहकांची खात्री होती.

रामायणात कुंकवाचा उल्लेख येतो, तो असा: वनवासातील राम-सीतेचा चित्रकूटमध्ये प्रवेश झाला तेव्हा सीतेचे स्वागत अनुसूयेने कुंकू लावून केले होते. कुंकुमतिलकाची प्रथा महाभारत काळापासून अस्तित्वात आली असल्‍याचे उल्‍लेख सापडतात. महाभारतात द्रौपदीच्या सोळा शृंगारामध्ये कुंकू लावण्याचे, तसेच कृष्णाची सखी राधा हीचे कपाळावर कुंकू रेखाटत असल्याचे उल्लेख आहेत. मोहंजदारो-हडाप्पाच्या उत्खननात मिळालेल्या स्त्री प्रतिमांच्या कपाळावर कुंकू तर भांगामध्ये सिंदूर दिसतो. भारतीय संस्कृतीने कुंकवाला सौभाग्य अलंकाराचा दर्जा दिला आहे. नवऱ्याला कुंकू म्हणण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. विवाहाच्या निमंत्रणपत्रिकांना कुंकवाचे बोट लावण्याची, त्यावर कुंकवाच्या पाण्याचा शिडकावा करण्याची प्रथा आहे. कुंकवाचे उल्लेख वाङ्मयात साधारणपणे तिसऱ्या, चौथ्या शतकापासून दिसू लागतात. रघुवंशात, भर्तृहरीच्या शृंगारशतकात व अमरुशतकात कुंकुमतिलकाचा उल्लेख आढळतो. स्त्रियांच्या कपाळी कुंकू तिसऱ्या-चौथ्या शतकात रंगवलेल्या अजिंठ्याच्या स्त्री-चित्रांमधूनही क्वचित दिसते.

हिंदू स्त्रिया नवे वस्त्र वापरायला काढताना त्याला प्रथम कुंकू लावतात. कुंकू हे सुवासिनीने सुवासिनीला लावायचे असते. लग्नप्रसंगी कित्येक जातींत वधू-वराच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरतात.

स्त्रियांनी कुंकूमदान करावे असा संकेत आहे. तो मंत्र ‘दानचंद्रिके’त पुढीलप्रमाणे आहे :कुंकुमं शोभनं रम्यं सर्वदा मंगलप्रदम् | दानेनास्य महत्सौख्यं स्यात् सदा मम ||

(कुंकू हे शोभिवंत, रम्य व सर्वदा मंगलप्रद आहे. त्याच्या दानाने मला महत्सौख्य व सौभाग्य प्राप्त व्हावे

हळद आणि पापडखार व सवागी यांच्या मिश्रणातून कुंकू बनवले जाते. हळदीत रोगप्रतिबंधक शक्ती असते. ते पूर्वी गावोगाव घरगुती पद्धतीने तयार केले जाई. हळदीचे कुंकू कसे तयार होते असे विचारताच केमचे राजेंद्र गोडसे सांगू लागले, “हळदीपासून कुंकू बनवले जाते. कुंकू करण्याची परंपरा आमच्याकडे सुमारे दीडशे वर्षांची आहे. हळद दळण्यासाठी आमच्या घरी बैलजाते होते. दोन बैल जोडून हळद दळली जात असे. पुढे, घरात ओळीने जाती बसवली गेली. कामाला आलेल्या बायका हळद दळत तेव्हा त्या जात्यावरच्या ओव्या म्हणत. दळलेली हळद आणि इतर रसायने यांचे मिश्रण ओले असते. ओल्या कुंकवाचे वाळवण उन्हात घातले जाते. धूळ, पाऊस यांपासून ओल्या कुंकवाला जपले जाते. हळद महाग झाली. पर्यायाने हळदीचे कुंकूही महाग झाले. त्यामुळे हळदीच्या कुंकवाचा भाव एकशेपस्तीस ते दीडशे रुपये प्रती किलो असा आहे. तरीही काही लोक आवडीने हळदीचे कुंकू खरेदी करतात. मात्र केवळ हळदीपासून कुंकू तयार करून आमचा धंदा चालू शकणार नाही.”

केममध्ये हळदीबरोबर चिंचोका, रताळ्याची पावडर, टोपिओका, डोलामॅट यांपासून कुंकू बनवले जाते. हळद सांगलीच्या बाजारातून तर डोलामॅट, स्टार्च, रताळ्याची पावडर हे पदार्थ कर्नाटकातून आणले जातात.

केममध्ये कुंकू चिंचोक्यापासूनही मोठ्या प्रमाणात बनवले जाते. त्यासाठी बार्शीच्या मार्केटमधून चिंचोके खरेदी केले जातात. चिंचोक्यावरील काळे-तपकिरी टरफल काढले जाते. चिंचोके भाजावे लागतात. टरफल काढलेल्या चिंचोक्यांचा पांढरा गर कुंकू बनवण्यासाठी उपयोगी येतो. चिंचोके दळण्याची चक्की आहे. तेथे केममधील साऱ्या कुंकू उत्पादकांचे चिंचोके दळले जातात. दळलेल्या चिंचोक्यांच्या पावडरमध्ये सेल्फिक अॅसिड, नायट्रिक अॅसिड, हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि ऑईल घालून ते मोठ्या मिक्सरमध्ये ढवळले जाते. एकजीव झालेले कुंकू ओले असते. ते धुळीपासून सांभाळत कडकडीत उन्हात सुकवले जाते.

कुंकवाचे वाळवण हा रमणीय सोहळा असतो. कामगार तीस-बत्तीस किलो वजनाची छोटी बोचकी पाठीवर घेऊन जेव्हा ओल्या कुंकवाचा सडा घालत असतात तेव्हा ते क्षण पाहण्यासारखे असतात. कुंकवाने रंगलेले कामगार लालेलाल कुंकवाचे वाळवण घालताना कुंकवापेक्षा वेगळे राहत नाहीत.

कुंकू उत्पादक राजेंद्र गोडसे म्हणाले, की “साधारणपणे 1970 च्या आसपास हळदीपासून बनवलेल्या आमच्या कुंकवाची मागणी अचानक कमी झाली. त्याचा शोध घेतल्यावर कळले, की अमरावतीमध्ये तयार होणाऱ्या कुंकवाने सारे मार्केट काबीज केले आहे. तेथे बनणारे कुंकू स्वस्त होते. मग आम्हीही हळदीबरोबर अन्य प्रकारचे कुंकू बनवू लागलो.”

केमच्या कुंकवाच्या स्पर्धेत अमरावती, पंढरपूर, जेजुरी, अकलूज, इंदापूर, पुणे येथील कुंकू कारखाने आहेत. हळदीपासून दोनच प्रकारचे कुंकू तयार होऊ शकते. एक म्हणजे लाल कुंकू आणि दुसरा पिवळा भंडारा, पण अन्य माध्यमातून जवळ जवळ पंचवीस प्रकारचे कुंकू बनवले जाते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुलाल, वारकरी लावतात तो अबीर (बुक्का) व अष्टगंधही तयार होते. केममध्ये ऐंशी टक्के कुंकू चिंचोक्यापासून तर वीस टक्के कुंकू हळदीपासून बनवले जाते. कुंकू केममधून पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, सोलापूर, भगवंताची बार्शी या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाते. त्याचप्रमाणे केमच्या कुंकवाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या महाराष्ट्राशेजारील राज्यांतही मागणी आहे.

कुंकू कारखान्यात काम करणारे कामगार हे अर्धकुशल गटात मोडतात. त्यांना रोजगार साधारणपणे तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत मिळतो. कुंकू बनवण्याचा कालखंड हा सप्टेंबर ते मे असा नऊ महिन्यांचा असतो. पावसाळ्याच्या कालावधीत कुंकू उद्योग थंडावतो. कारण पावसाळ्यात कुंकू वाळवता येत नाही. कामगार बहुतेक अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते पावसाळ्यात त्यांच्या शेतात काम करतात.

कुंकवाची वाहतूक ट्रकमधून होते. त्या गाड्यांत भराई करणाऱ्या कामगारांच्या टोळ्या आहेत. एक टोळी साधारणपणे दहा लोकांची असते. तशा आठ-नऊ टोळ्या केममध्ये आहेत. प्रत्येक कारखान्यात कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त वीस अशी कामगारांची संख्या आहे. ते सकाळी नऊ वाजता त्या कामगारांचे रोजचे काम सुरू होते, ते आदल्या दिवशी बनवलेले ओले कुंकू वाळत घालण्यापासून. त्यानंतर मग नवीन कुंकू बनवण्यास सुरुवात होती

केम या नावाची उत्पत्ती कशी झाली याबाबतची आख्यायिका श्रवणीय आहे. फार पूर्वी उज्जैन नगरीत राजा क्षेम राज्य करत होता. त्यास श्वेतकुष्ठाची बाधा झाली. अनेक उपचारनंतरही त्याला फरक पडला नाही. त्याने शंकराची आराधना केली. भगवान शंकरांनी क्षेम राजास दक्षिण दिशेस जाण्यास सांगितले. फिरत फिरत, राजा त्या गावात आला. शंकराच्या दृष्टांतानुसार त्याने तलाव खोदला. त्यात राजाला सात शिवलिंगे सापडली. त्यातील एक लिंगाची उत्तरेश्वर या नावाने प्राणप्रतिष्ठा केली. अन्य सहा शिवलिंगेही वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केली गेली. त्या तलावात अंघोळ करताच क्षेम राजाचे कुष्ठ नष्ट झाले. ही झाली पुराणकथा. या परिसरात क्षेम राजाने त्यापचे नगर वसवले असेल. त्या नगराचे नाव क्षेम असावे. पुढे ते अपभ्रंशित होऊन केम झाले असावे असा अंदाज वर्तवला जातो. केमच्या ग्रामदैवताचे, उत्तरेश्वराचे पुरातन मंदिर गावात आहे. त्या मंदिराच्या मागच्या बाजूस पिंडीच्या आकाराची विहिर आहे. उत्तरेश्वराच्या जत्रेमध्ये मातंग, ब्राम्हण आणि मराठा समाजाला मान असतो. पुराणकथेप्रमाणे गावात इतर सहा शिवलिंगे पाहायला मिळतात. उत्तरेश्वराच्या मंदिरासमोर दर शनिवारी मोठा बाजार भरतो.

शासनाने केमच्या कुंकू उद्योगाला लघुउद्योगाचा दर्जा दिला आहे, पण उद्योजक त्यासाठी मिळणाऱ्या सवलती घेऊ शकत नाहीत. कारण बहुतेक सारे उद्योग हे पाच-सहा पिढ्यांपासून चालू आहेत. लघुउद्योग सुरू करण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करताना अनेक अडचणी निर्माण होतात. नवा उद्योग सुरू करण्याचे प्रस्ताव देताना जागा, कच्चा माल, यंत्र यांच्यासाठी आर्थिक मदत शासन देते. केममधील उद्योजकांसाठी तीच समस्या आहे. कारण त्यांच्याकडे यंत्रसामुग्री, जागा ही खूप आधीपासूनची आहे आणि फक्त कच्च्या मालासाठी शासनाची आर्थिक मदत मिळत नाही. शासनाने कुंकू निर्मितीच्या लघुउद्योगाबाबत पुन्हा वेगळ्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे.

केममधील कुंकू उत्पादकांची संघटना आहे. सर्व कुंकू उत्पादकांना त्यांचा उद्योग वाढवायचा आहे. त्यासाठी उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीचे स्वप्न त्या साऱ्यांनी उराशी जपले आहे. त्यांनी ‘उत्तरेश्वर औद्योगिक वसाहत’ नावाने एक संस्था स्थापन केली आहे. मनोज सोलापुरे हे त्या संस्थेचे अध्यक्ष तर सचिव मिलिंद नरखेडकर आहै त. त्यांचे प्रयत्न लहान स्वरूपाच्या एमआयडीसीला मान्यता मिळावी म्हणून चालू आहेत. उद्योजकांनी वीस एकर जागा खरेदी केली आहे, त्यांचा प्रस्ताव शासनदरबारी विचाराधीन आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!