चिखलठाण येथील श्री कोटलिंग मंदिरासाठी २ कोटी रूपये निधी मंजूर

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : चिखलठाण (ता. करमाळा) येथील प्रसिध्द देवस्थान कोटलिंग मंदिरासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून २ कोटी रूपयाचा निधी मंदिर विकासासाठी मिळाला आहे; अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी दिली आहे.
याबाबत श्री.बारकुंड म्हणाले, की चिखलठाण येथील श्री कोटलिंग देवस्थानसाठी तालुकाबाहेरील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. एवढेच नाहीतर या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. त्यादृष्टीने मंदिर व परिसराचा विकास होणे गरजेचे आहे. त्या मंदिर विकासासाठी आमदार संजयमामा शिंदे यांचेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे.
त्यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत २ कोटी रूपयाचा निधी मंदिर विकासासाठी मंजूर केला आहे. या निधीतून टोपेबाबा मंदिर ते कोटलिंग देवस्थान पर्यंत पोहोचरस्ता करणे व स्ट्रीट लाईट बसविणे या कामासाठी १ कोटी रूपये, कोटलिंग देवस्थान परिसरात घाट बांधणे या कामासाठी १ कोटी रूपये असा निधी मंजूर केला आहे. हा निधी मिळाल्यामुळे चिखलठाण नं. १ व २ येथील ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.

