मांजरगाव येथील अवैध ‘दारू विक्री’ तात्काळ बंद करण्यासाठी सरपंच व महिला ग्रामस्थांच्यावतीने निवेदन…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.२३) : मांजरगाव (ता.करमाळा) येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री करून गावातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली जात असून, दारूमुळे गावातील अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत, तसेच नवीन पिढी दारूच्या व्यसनाच्या आहारी जावून बरबाद होत आहे.
मांजरगाव आणि पंचक्रोशीला या अवैध दारू धंद्याच्या त्रास होत असून गावात भांडणे मारामाऱ्या वाढत आहेत. त्यामुळे सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घेवून गावांमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांवर तात्काळ कठोर कार्यवाही करावी व अवैध दारू विक्रीला आळा घालावा असे निवेदन मांजरगाव सरपंच व सदस्या तसेच ग्रामस्थ व महिलांनी येथील करमाळा पोलीस स्टेशन तसेच तहसीलदार यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, मांजरगाव येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देतो की, मांजरगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांसह आम्ही सर्व सदस्या महिला असून सर्व महिला ग्रामपंचायत सदस्यांना मांजरगाव ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून दिले आहे. आमच्या गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी आम्ही सर्वजणी ग्रामस्थांच्या संपूर्ण सहयोगाने आटोकाट प्रयत्न करत आहोत, मात्र मांजरगाव मध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री करून गावातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली जात आहे. दारूमुळे गावातील अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. नवीन पिढी दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे. मांजरगाव आणि पंचक्रोशीला या अवैध दारू धंद्याच्या त्रास होत असून गावात भांडणे मारामाऱ्या वाढत आहेत. तरी कृपया आमच्या या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन गावांमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांवर तात्काळ कठोर कार्यवाही करावी व अवैध दारू विक्रीला आळा घालावा असे आवाहन या निवेदनाद्वारे केले आहे.