तालुकास्तरीय काव्य वाचन स्पर्धेत धन्वंतरी काळे प्रथम.. - Saptahik Sandesh

तालुकास्तरीय काव्य वाचन स्पर्धेत धन्वंतरी काळे प्रथम..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : येथील करमाळा साहित्य मंडळ व ग्रामसुधार समिती यांचे वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या तालुकास्तरीय खुल्या काव्यवाचन स्पर्धेत धन्वंतरी काळे यांचा प्रथम क्रमांक आला आहे.

या स्पर्धा आज (ता.२५) येथील महादेव मंदिरा समोरील जयवंतराव जगताप बहुउद्देशीय सभागृहात संपन्न झाल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, माजी प्राचार्य नागेश माने, ॲड. अपर्णा पदमाळे व ग्रामसुधार समितीचे उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे हे उपस्थित होते.

या स्पर्धेत २० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये द्वित्तीय क्रमांक संदीप हुलगे, तृतीय क्रमांक चारू देवकर, उत्तेजनार्थ क्रमांक प्रतिमा काटूळे व प्रा. शितल वाघमारे यांना देण्यात आला.

या स्पर्धेसाठी गणेश चिवटे यांनी १० हजार रूपये देणगी दिली होती. त्यापैकी ५ हजार रू. चे प्रथम बक्षीस व संयोजनासाठी ५ हजार रू. दिले होते. द्वित्तीय बक्षीस श्रेणिकशेठ खाटेर यांनी ३००० रू. तेजीबाई व पन्नालाल खाटेर यांचे स्मरणार्थ दिले होते. तृतीय बक्षीस प्रा. नागेश माने यांनी २००० रू. सोनल माने यांचे स्मरणार्थ तर उत्तेजनार्थ बक्षीस संदेश परिवाराकडून १००० रू. तुकाराम हिरडे गुरुजी यांचे स्मरणार्थ व नाथाजीराव शिंदे यांनी १००० रू. यशोदाबाई व विठोबा शिंदे यांचे स्मरणार्थ दिले होते.

उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड, अनिल माने, तेजस धेंडे, बाळासाहेब गोरे, संतोष कांबळे, राजेंद्र साने यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ॲड. बाबूराव हिरडे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ.सुनिता दोशी यांनी केले.

या स्पर्धेचे परिक्षण ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड, नवनाथ खरात व खलील शेख यांनी केले. यावेळी कवी दादासाहेब पिसे, नवनाथ खरात, खलील शेख, तेजस धेंडे, संतोष कांबळे यांनी आपल्या कविता सादर केल्या. आभार कवी खलील शेख यांनी मानले.

काव्य स्पर्धा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून अशा उपक्रमासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभा राहू. – गणेश चिवटे (अध्यक्ष, श्रीराम प्रतिष्ठान )

तालुकास्तरीय काव्यवाचन स्पर्धेत गुणवत्ता दिसून आली. यापुढे जिल्हास्तरीय स्पर्धा घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. – श्रेणिकशेठ खाटेर (सामाजिक कार्यकर्ते)

साहित्य मंडळ व ग्रामसुधार समितीने हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम घडवला. अशा कार्यक्रमाची निश्चितच गरज आहे. यातूनच उत्तम कवी घडतील. – प्राचार्य नागेश माने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!