करमाळा शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : मुख्याधिकारी सचिन तपासे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील पाणीटंचाई गंभीर स्वरूप घेत असून, याच्यावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू असून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे नूतन करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपासे यांनी सांगितले.
येथील शिवसेना कार्यालयात नूतन मुख्याधिकारी सचिन तपासे यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी जेष्ठ पत्रकार नासिर कबीर, कमलाकर भोज, रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण उपस्थित होते.
करमाळा नगरपालिकेचा कारभार ताब्यात घेतल्यानंतर आपले कडक धोरण दाखवत त्यांनी दहिगाव येथील करमाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसवरून चार इंची काळा हस्ती पाईप अडीच लाख रुपये किमतीचा चोरीला गेला आहे, याची दखल घेऊन आज तात्काळ मुख्याधिकारी सचिन तपासे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे
या ठिकाणी काळा पाईप उपलब्ध नसल्यामुळे पाणीपुरवठा करण्यास अडचण येत आहे, करमाळा नगरपालिकेने एका ठेकेदाराला चारी खोदून जॅकविलला पाणी कमी पडू देऊ नये, यासाठी 24 लाख रुपयेचे टेंडर दिले आहे. मात्र संबंधित ठेकेदार वेळेवर काम करत नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
आम्ही जिल्हा नियोजन मंडळातून करमाळ्यातील इतर निधी रद्द करून, पाणीटंचाई होऊ नये म्हणून तात्काळ जॅकवीला पाणीपुरवठा करण्यासाठी 24 लाख रुपये मंजूर केले होते, मात्र ठेकेदार गाफीलपणे काम करत आहे व प्रशासकीय अधिकारी त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत, यामुळे पाणीटंचाई होत आहे, यामुळे या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.