करमाळ्यात पाल ठोकून राहणाऱ्या चोरांना शंभूराजे जगताप यांनी दिले पोलिसांच्या ताब्यात..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मागील काही दिवसांपासून करमाळा शहर आणि परिसरात अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या होत असताना त्यांचा तपास काही केल्या लागत नव्हता, पोलिसांना चोर सापडत नव्हते. आज (ता.२१) सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान बायपास रोड, कृष्णाजी नगर येथे एक चोरीची घटना झाली.चोरट्यांनी चोरी केल्यानंतर ते देवीचा माळ पायथ्याकडे पळून गेले. यानंतर जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी मोठ्या धाडसाने पाठलाग करून ते चोरटे पकडले व एवढ्यावरच न थांबता त्या सगळ्यांना एका टेंपोत बसवून तो टेंपो थेट पोलीस स्टेशन मध्ये दाखल केला.
या सर्व प्रकारात गोंधळ पाहून काही लोक पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर पोलीस स्टेशन येथे मोठ्या प्रमाणावर नागरीक जमा झाले होते. याप्रसंगी शंभूराजे जगताप यांनी पोलीस स्टेशनच्या कारभारावर सर्वांसमोर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वीच शहरातील एका युवकाने आत्महत्या केली होती त्याचा साधा गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीसांनी तब्बल १२ दिवस का लावल ? डिवायएसपी यांना मी स्वतः १६ काॅल लावले पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.अश्याने गुन्हेगारांवर वचक राहिल का ? चोरीला गेलेल्या मोबाईलची चोरीची तक्रार दाखल न करता गहाळ झाल्याची तक्रार का घेतात ? सहज तपास लावता येईल अशा मोबाईल चोरांवर का कारवाई केली नाही ? एका व्यक्तीच्या घरातून १३ लाखांहून अधिक रकमेची चोरी झाली होती, त्या तपासाचे काय झाले ? चोरीची तक्रार देण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टर मालकाला सहा दिवस हेलपाटे का मारायला लावले ? एखाद्या आपात्कालीन परिस्थितीत अधिकाऱ्यांना फोन लावला तर अधिकारी फोन घेत नाहीत, याउलट वाळू आणि इतर ठिकाणी हफ्ते गोळा करायला मात्र वेळेवर कसे काय पोहोचतात? – शंभूराजे जगताप
चोरट्यांचा धाडसाने पाठलाग करून त्यांना पकडून थेट पोलीसांच्या ताब्यात देण्याच्या या धाडसाबद्दल शंभूराजे जगताप यांचे अनेकांनी कौतुक केले. जे काम पोलीसांनी करायला पाहिजे ते काम शंभूराजे जगताप यांनी मोठ्या धाडसाने केले आहे.