बोटीतील 6 जण अद्याप बेपत्ता – नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश – शोधकार्य युद्धपातळीवर सुरूच..!
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.22) : कुगाव (ता.करमाळा) ते कळाशी (ता.इंदापूर, जि.पुणे) या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यामुळे काल (ता.21) सायंकाळी प्रवासी बोट उलटली व त्यामध्ये असलेले सात प्रवासी पाण्यात बेपत्ता झाले, परंतु त्यातील एकजण पोहत पाण्याबाहेर आल्याने बचावला आहे. मात्र सहाजणांचा गेल्या २४ तासापासुन तपास सुरु असून ते अद्याप बेपत्ता आहेत. २४ तास झाल्यानंतरही त्यांचा शोध लागलेला नाही. एनडीआरएफचे पथक व खासगी बोटीच्या साह्याने त्यांचा शोध सुरु असून, बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा परिसरात दिवसभर आक्रोश सुरु आहे, तसेच या उजनीच्या परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.
कुगाव येथील अनुराग ज्ञानदेव अवघडे (वय २८ बोट चालक) व गौरव धनंजय डोंगरे (वय २४) हे बेपत्ता आहेत. तर झरे येथील गोकुळ जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव (वय २५), माही गोकुळ जाधव (वय ३) व शुभम गोकुळ जाधव (दिड वर्ष) हे बेपत्ता आहेत. सोलापूर येथे पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे बोट उलटल्यानंतर बाहेर आले होते. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार नारायण पाटील, खासदार सुप्रिया सुळे, भाजपाचे गणेश चिवटे, तालुक्यातील अनेक राजकीय तसेच विविध पदाधिकारी यांनी घटनस्थळी भेट दिली. तहसीलदार शिल्पा ठोकडे, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे मदत कार्यासाठी तळ ठोकून आहेत.
काल (ता.21) सांयकाळी घटना घडल्याचे समजल्यापासून बेपत्ता व्यक्तींचे शोध कार्य सुरु असून, काल मंगळवार रात्री अंधारात तपास कार्यात अढथळा आला होता. त्यामुळे आज (बुधवारी) सकाळी साडेसात वाजता शोध कार्य सुरु झाले. करमाळा हद्दीतील कुगावसह परिसरातील नागरिकांकडून शोध घेतला जात आहे तर कळाशीच्या हद्दीत शोध मोहीम सुरु आहे. एक पाणबुडी, तीन बोटी व २० जवान हे शोध घेत आहेत. त्यांच्या मदतीला परिसरातील मच्छिमारांच्या व प्रवासी बोटी धावल्या आहेत. त्या माध्यमातून शेकडो नागरिक मदत कार्य करत आहेत.
शोध कार्य सुरु असताना बोट उलटली तेथे पाण्यात ऑइल तरंगत होते. त्यावरून तेथे बोट असल्याचे निष्पन्न झाले. बोटीचा लंगर लावूनही पाण्यात उलटलेल्या बोटीचा शोध सुरु होता. तेव्हा उलटलेली बोट सापडली. त्यानंतर त्या बोटीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ती बोट खडकात अडकली. त्यामुळे तिला बाहेर काढता आले नाही. दरम्यान त्या बोटीत पाणबुडीच्या साह्याने व्यक्तींचा शोध घेण्यात आला. मात्र शोध लागला नाही. सायंकाळी ४ वाजता पुन्हा वारे आल्याने शोध कार्य बंद करावे लागले.
शोध कार्य सुरु असताना भीमा नदीच्या दोन्ही बाजूला परिसरातील साधणार सातशे ते आठशे लोक उपस्थित होते. येथे रुग्णवाहिका व पोलिसांचा बंदोबस्त होता. आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचे चिरंजीवही बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या घरीही आक्रोश पहायला मिळाला. येथे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, मकाईचे संचालक सचिन पिसाळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे, दत्तात्रय सरडे, प्रा.रामदास झोळ, नानासाहेब लोकरे, चंद्रकांत सरडे, विकास गलांडे, राजेंद्र बारकुंड यांनी भेटी दिल्या.
भीमा नदीच्या पात्रात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शोध कार्यात मदत मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून, प्रशासनाला योग्य त्या कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून येथील पूल लवकर होणे आवश्यक आहे. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरु राहणार आहे, तसेच येथील प्रत्येक बाबीवर लक्ष ठेऊन असून मदतीत कोणतीच कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत प्रशासनाला कळवले आहे. – आमदार संजयमामा शिंदे