डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त करमाळा येथे अभिवादन

करमाळा (दि.२१) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा करमाळा या शाखेच्या वतीने २० ऑगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन व राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून संभाजी ब्रिगेड कार्यालय येथे डॉक्टर दाभोळकर यांना अभिवादन करून करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य नागेश माने यांच्या हस्ते झाले. यानंतर डॉ. दाभोळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अनिल माने ,राजेंद्र साने, बाळासाहेब दूधे यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अभिवादन गीताने केली.

यावेळी यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समिती करमाळा तालुका अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी विवेकाचा आवाज बुलंद करूया असे उद्गार काढत वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय ते आपल्या भाषणात विस्तृतपणे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉक्टर दाभोळकरांचे साहित्य हे सूर्यप्रकाशासारखे निखळ आणि स्वच्छ आहे. संत, समाजसुधारक, व विचारवंत यांच्या विचाराचा वारसा त्यांनी पुढे चालवत अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दलचे कार्य लोकशाही पद्धतीने विवेकाची कास धरून लोकहिताचे कार्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आपले सर्व आयुष्य खर्ची टाकून पुढे चालविले व ते कार्य आजही अविरतपणे चालू आहे व पुढे चालू राहील असे मत व्यक्त केले.

प्राध्यापक शिवाजी दळवी यांनी इतर समविचारी संघटनांनी अनिस चळवळीस योगदान द्यावे व जास्तीत जास्त युवकांनाही अनिस मध्ये जोडून घ्यावे असे आव्हान केले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य नागेश माने यांनी डॉक्टर दाभोळकरांनी आपल्या जीवनामध्ये विविध धोके पत्करून समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे कार्य करत त्यांनी महाराष्ट्रातील एक मोठी चळवळ उभा केली. लोकशाहीचा खांब बळकट करणारा निर्भीड माणूस, विवेकवादाची कास धरणारा निर्भीड कार्यकर्ता अशा समाज सुधारकाची हत्या होऊन अकरा वर्षे झाली. माणूस मारता येतो परंतु त्याचे विचार मारता येत नाहीत असे ते म्हणाले.

यावेळी मोरेश्वर पवार ,संतोष माने, श्रेयस साने ,ओंकार माने, मनोज लटके भाऊसाहेब ,सुनील गायकवाड ,रामचंद्र बोधे गुरुजी, डॉक्टर आप्पासाहेब लांडगे, केशव घाडगे ,प्रथमेश माने, आनंदीताई घिगे पाटील विष्णु शिंदे सर महेश जगताप सर भाऊसाहेब पाटील आदिजन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अनिसचे कार्याध्यक्ष अनिल माने यांनी आभार व्यक्त केले.


