घारगाव येथे काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न
करमाळा (दि.६) – घारगाव येथे सालाबाद प्रमाणे श्री काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्याचे यंदाचे ३४ वे वर्ष होते.
घारगाव येथे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज यांचे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिर परिसरातच हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये पहाटे ५ ते ७ काकडा आरती भजन, सकाळी ७ ते ८ विष्णू सहस्त्रनाम ८ ते १० ज्ञानेश्वरी १० ते ११ गाथा पारायण सायंकाळी ५ ते ६.३० हरिपाठ ,७ ते ९ हरिकिर्तन सेवा,९ ते १० भोजन पंगत, रात्री १० ते १२ हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम झाले.
या सप्ताहामध्ये विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तने या आयोजित करण्यात आली. यामध्ये ह.भ.प. तुकाराम महाराज जेकटेवाडी(घारगाव) , ह.भ.प गोविंद महाराज निमगाव, ह.भ.प. परदेशी महाराज शेळगाव, ह.भ.प. घोडके महाराज वरकुटे, ह.भ.प. शिंदे महाराज आनाळा, ह.भ.प. अॅड. बाबुराव हिरडे महाराज करमाळा , ह.भ.प.श्री परमेश्वर भाऊ खोसे महाराज गिरवली ,या नामवंत किर्तनकारांची हरीकीर्तन सेवा झाली तर २४ नोव्हेंबरला सकाळी ०९ ते ११ वा.यावेळेत ह.भ.प. योगीराज रणजित बापू महाराज आरणगाव यांचे काल्याचे हरी कीर्तन सेवेने सप्ताह कार्यक्रमाची सागंता झाली. या कीर्तनांना घारगाव व परिसरातील भाविकांनी उपस्थित राहत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
सप्ताह दरम्यान घारगाव ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद भोजन पंगत झाली. कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्थापन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ घारगाव यांच्या वतीने करण्यात आले.
घारगावच्या माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी संजय सरवदे, सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे यांच्याकडून १०१ हरिपाठ पुस्तकाचे वाटप उपस्थित भाविकांना ह भ प घोडके महाराज, शंकर लेकुरवाळे, देविदास सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सरवदे परिवाराकडून सर्व भाविक भक्तांना दरवर्षीप्रमाणे पंगत अन्नदान करण्यात आली.