नागरीकांच्या अपेक्षा पूर्ण करणार : माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा (दि.१८) – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये करमाळा मतदार संघातील मतदारांनी लबाडी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली. याउलट आमच्यावरती विश्वास ठेवून नारायण आबा पाटील यांना प्रचंड मताने आमदार केले आहे. अर्थातच नागरीकांच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा आगामी कालावधीत आम्ही पूर्ण करू; असे जगताप गटाचे नेते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले. १२ डिसेंबरला वाढदिवसानिमित्ताने ते सा.संदेशशी बोलत होते.
पुढे बोलताना जगताप म्हणाले, की सन २०१९ च्या निवडणुकीमध्ये आम्ही माजी आमदार संजयमामा शिंदे यांना पाठबळ दिले होते. तालुक्याचा विकास करू; अशा पध्दतीचे
आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात मात्र दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला. याउलट न केलेल्या विकासकामाचा गवगवा करत तीन हजार चारशे कोटीची कामे केल्याचे मतदारांना सांगितले. बारामतीचे आमदार व विद्यमान उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या मतदार संघात गेल्या पाच वर्षात एक हजार कोटीची कामे केल्याचे जाहीर करत आहेत. अर्थमंत्र्याच्या मतदार संघात १ हजार कोटी आणि साध्या आमदाराच्या मतदारसंघात ३४०० कोटीची कामे कशी होतील..? खोटे बोलणाच्याची जागा येथील मतदारांनी दाखवले आहे. माजी खासदार हेही एकदा तासाला कोटीच्या कामाची भाषा करत होते, त्यांनाही मतदारांनी जागा दाखवली आहे. याउलट आमच्यावर विश्वास टाकून नागरीकांनी पाटील यांना १७ हजार १०९ मताधिक्याने आमदार केले आहे. अर्थातच मतदार संघातील नागरीकांच्या आमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. या अपेक्षा आम्ही नक्कीच पूर्ण करू. खोटे आश्वासना पेक्षा जे वास्तव आम्हाला करता येईल ते आम्ही करू व जनतेचा विश्वास सार्थ करू. गावागावात योग्य त्या सुविधा पोहोचवण्यासाठी आपण स्वतः आमदार नारायण आबा पाटील यांचे मार्फत प्रयत्न करू.
आगामी कालावधीतील करमाळा तालुक्यातील सर्व निवडणुकांमध्ये हाच पॅटर्न राबविला जाणार आहे. जगताप गट, मोहिते- पाटील गट, आमदार पाटील गट व सावंत गट असे आम्ही सर्व एकत्रित येऊन सर्व निवडणुका लढवू. विशेषत: नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढू व यश हासिल करून पारदर्शक कारभार करू व स्थिर प्रशासन देऊ.
● माजी आमदार जयवंतराव जगताप





