सत्तेचा रिमोट कंट्रोल

असं म्हटलं जातं की ज्या माणसाला आयुष्यात स्वतःचं स्थान गमवायचे नसेल आणि जीवनात यशस्वी व्हायचं असेलतर कुठं थांबायचं.. हे कळाले पाहिजे. ज्याला कुठं थांबायचं, कुठ काय बोलायचं आणि कोणाशी संबंध जोडायचे हे कळतं तोच माणूस जीवनात यशस्वी ठरत असतो.
अशाचप्रकारे करमाळा तालुक्याच्या राजकारणातील एक यशस्वी व्यक्तीमत्व म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेकडे पहावे लागेल. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत फारसा अनुभव नसताना, पक्षाचं तिकीट नसताना जगताप गटाच्या पाठबळाच्या जोरावर ते अपक्ष म्हणून निवडून आले. १९९० ते १९९५ पर्यंत त्यांची स्वत:ची एक वेगळी इमेज निर्माण झाली. कार्यकर्ते जोडले गेले. तालुक्यात त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जगताप गट कामकाज करू लागला. कदाचित त्यांच फुललेले व्यक्तीमत्व त्यांच्याच काही जवळच्या लोकांना खटकलं यातूनच मोहिते-पाटलांच्या आधाराने डिगामामांना पाठबळ देण्यात आलं आणि त्यावेळी जगताप यांना यशाने हुलकावणी दिली.
त्यानंतर १९९९ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा कार्यकर्त्यांची मोट बांधली आणि मोठ्या हिंमतीनं निवडणूक लढवली. त्यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि त्या पक्षाचं पहिलं तिकीट नारायण आबा पाटील यांना देण्यात आलं. नारायण आबांना जी मतं मिळाली त्याचा फटका जगतापांना बसला आणि अवघ्या ६७१ मतांनी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पुन्हा त्यांनी चिकाटीनं जोरदार प्रयत्न केले आणि समयसुचकता पाहून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री. पाटील यांनी निवडणूक न लढवता जगताप यांना समर्थन दिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा जगताप हे आमदार झाले. त्यानंतर वर्षभरातच दिगंबरराव बागल यांचे निधन झाले आणि त्यानंतर बागल गटाला सहानुभूतीचे वलय मिळालं. त्यामुळे सन २००९ च्या निवडणुकीत श्री.जगताप हे तिसऱ्या स्थानी फेकले गेले.
त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत नारायण आबा पाटील व रश्मी बागल या दोघांची स्पर्धा झाली. त्यातच संजयमामा शिंदे हे ही स्पर्धेत आले. अर्थातच श्री. जगताप हे चौथ्या स्थानी फेकले गेले. दोन निवडणुकीचा अनुभव घेतल्यानंतर श्री. जगताप यांनी सत्तेचा मोह बाजुला ठेवून विधानसभा निवडणुकीतून ते बाजुला झाले. आणि त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतसंजयमामा शिंदे यांना पाठबळ दिले व ते आमदारही झाले. आपण आमदार होवू शकलो नाहीतरी आपण ठरवू तो आमदार होवू शकतो. ही बाब पक्की ठरवून त्यांनी २०१९ ला संजयमामा तर २०२४ ला नारायण पाटील यांना आमदार बनवलं आहे. संजयमामा शिंदे हे विद्यमान आमदार असतानाही केवळ जयवंतराव जगताप त्यांच्या सोबत नव्हते. म्हणूनच त्यांना प्रचंड मताने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तालुक्याच्या राजकारणात जगताप गटाचे वेगळे स्थान आहे. असे असूनही त्यांनी निवडणुका लढविण्यापेक्षा किंगमेकर होणं स्विकारलं आणि व्यापध्दतीने त्यांना यशही मिळालं. राज्यात महायुतीचे बहुमत असताना जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीलाच बहुमत आहे. आगामी कालावधीत होणाऱ्या निवडणुका मध्ये जगताप हे सत्तेचे रिमोट कंट्रोल असणार आहेत. जगताप यांना बाजार समिती व नगरपालिका या दोन संस्थामध्ये इंटरेस्ट असतो. आणि या संस्थांच्या सत्ता या ना त्या
माध्यमातून आबाधित ठेवतात. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुका मध्ये मार्गदर्शनाखाली विद्यमान आमदार नारायण पाटील
जगताप यांच्या गट, जगताप गट, मोहिते-पाटील गट व सावंत गट हे चार गट एकत्रित निवडणुका लढवणार आहेत. त्यांच्या सोबतीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट हेही त्यांचेही पाठबळ राहणार आहे. त्यामुळे पुढील सत्ता या ग्रुपलाच मिळण्याची दाट शक्यता आहे.
विरोधकामध्ये बागल गट व संजयमामा शिंदे गट हे एकत्रित येऊन निवडणूका लढले तरच निवडणुकीत लढत होऊ शकते. अन्यथा निवडणुकीत चुरस कुठेही दिसू शकणार नाही. अर्थातच श्री. जगताप हे विधानसभेला थांबले व त्यातूनच त्यांनी राजकारणही जमवलं आणि सत्तेचे रिमोट कंट्रोलही झाले.




