करमाळा (सुरज हिरडे) : ग्रामस्थांना ग्रामपंचायतीचा कर भरायला प्रोत्साहित करण्यासाठी करमाळा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायतीने शक्कल लढवली असून गृहोपयोगी वस्तूंचा लकी ड्रॉ आयोजित केला आहे. ग्रामपंचायत कर भरणाऱ्या करदात्यास एक कुपन दिले जाणारा असून 26 जानेवारीला लकी ड्रॉ मधून विजेते काढले जाणार आहेत.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना उंदरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच युवराज मगर म्हणाले की, “घरपट्टी, पाणीपट्टी यासारखा ग्रामपंचायतीचा कर भरण्यासाठी ग्रामस्थ नेहमीच उदासीन असतात. सध्याची थकबाकी पाहिली असता २००८-०९ पासून अनेक ग्रामस्थांची थकबाकी असल्याचे आम्ही पाहिले. दरवर्षी वीस ते तीस टक्केच कर वसुली होत असल्याचे समोर आले. जर ग्रामपंचायतीला कर मिळाला तरच ग्रामस्थांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकतात. ग्रामपंचायतीचा कर भरायला ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामसेवकांनी मिळून लकी ड्रॉ ची योजना सुरू करायची ठरविले. नुकतेच या योजनेला चार दिवस झाले असून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या योजनेमुळे ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्या लोकांमध्ये वाढ होईल असे दिसून येत आहे. ही योजना २१ जानेवारी पर्यंत असून या योजनेमध्ये कर भरणाऱ्या करदात्याला एक कुपन दिले जाणार आहे. २६ जानेवारीला लकी ड्रॉ चे कुपन काढून त्यातील विजेत्यांना गृहोपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत. यामध्ये ४ टेबल फॅन, ४ मिक्सर, ४ कुकर, ४ चहा कप सेट बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. एकूण २० विजेत्यांना ही बक्षिसे दिली जाणार आहे. ही सर्व बक्षिसे सरपंच युवराज मगर, ग्रामपंचायत सदस्य पूनम लोकरे, हर्षदा कांबळे सुप्रिया मगर, प्रभावती गरदडे, समाधान कांबळे, धनंजय कांबळे, शिवाजी कोकरे, ग्रामपंचायत अधिकारी यशवंत कुदळे यांच्या स्वखर्चातून ही बक्षिसे दिली जाणार”.
उंदरगाव ग्रामपंचायतीने राबवलेल्या या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या करात वाढ होण्याची शक्यता आहे. असा उपक्रम तालुक्यात प्रथमच राबविण्यात आलेला आहे. अशा प्रकारे ग्रामस्थांना कर भरण्यासाठी आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम विविध ग्रामपंचायतींनी जर आखले तर कर भरणाऱ्यांची संख्येत वाढ होऊन पर्यायाने गावाच्या विकासास मदत होऊ शकते.
लकी ड्रॉच्या बक्षिसा व्यतिरिक्त यंदाच्या वर्षांपासून १००% कर भरणाऱ्या ग्रामस्थांना आम्ही ग्रामपंचायतीमार्फत वापरासाठी दररोज गरम पाणी व पिण्यासाठी आर.ओ. फिल्टर पाणी करदात्यांना देणार आहोत. तसेच भविष्यात आम्ही पूर्ण कर भरणाऱ्या व्यक्तीस मोफत दळण व्यवस्था उपलब्ध करून देणार आहोत. ग्रामस्थांनी या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लवकरात लवकर ग्रामपंचायतचा कर भरून ग्रामपंचायत सहकार्य करावे व विकासात सहभाग घ्यावा.