करमाळा एसटी आगारातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी – दिग्विजय बागल

करमाळा (दि.९) : करमाळा एस टी आगारातील विविध समस्यांच्या संदर्भात एक स्वतंत्र बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी लावावेत अशा प्रकारच्या मागणी मकाई कारखान्याचे माजी चेअरमन व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील आगारात सध्या एस. टी. बसेस ची संख्या अत्यंत अपुरी आहे.त्यातील अनेक बस या कालबाह्य, नादुरुस्त असून अनेक बस आगारातून प्रवासाला सुटल्यानंतर रस्त्यात मध्येच बंद पडतात . त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होतो. बस संख्या कमी असल्याने प्रवाशांना अनेक तास स्थानकावर बसेस ची वाट पाहवी लागते. शालेय विद्यार्थी, महिला, प्रवासी या सर्वाचा प्रचंड त्रास होतो. तसेच आगारात २० ते २२ मेकॅनिकची गरज आहे .७ वाहतूक नियंत्रकाची आवश्यकता असून लिपिकाच्या ५ जागा रिक्त आहेत, स्थानक प्रमुख सध्या कोणाचीही नेमणूक नाही. चालक व वाहक असे मिळून २५ लोकांची आवश्यकता आहे.
मुख्यतः शाळा महाविद्यालये यांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना दररोज करमाळ्याला शिक्षणासाठी यावे लागते. अनेक वेळा विद्यार्थ्यांना बस वेळेवर येत नसल्याने शाळा महाविद्यालयात वेळेवर उपस्थीत राहता येत त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या बसेस मधेच बंद पडणे नादुरुस्त होणे हे प्रकार वारंवार होत आहेत. नादुरुस्त बसेस, बसची व कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने या सर्व गोष्टींचा परिणाम थेट करमाळा आगाराच्या उत्पन्नावर होत असून आगार तोट्यात आहे. बस स्थानकात प्रचंड अस्वच्छता आहे. आगारप्रमुखांचा प्रशासनावर वचक व धाक नाही.
या सर्व बाबींमुळे करमाळा बस आगाराची दुरवस्था झाली असून नादुरुस्त व कालबाह्य एस. टी. बसेस मुळे ४ दिवसांपूर्वी करमाळा ते कर्जतच्या एस. टी. बसच्या अपघात झाला त्यामध्ये अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत.
तरी वरील सर्व बाबींचा गांभीर्याने व सहानुभूतीपूर्वक विचार होऊन सदर प्रश्नाबाबत आपले प्रमुख उपस्थितीत एक स्वतंत्र बैठक करमाळा एस.टी. आगारमध्ये आयोजित करावी. अशी देखील मागणी या निवेदनात केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या भेटीमध्ये एसटी आगाराच्या प्रश्नांव्यतिरिक्त करमाळा शहराच्या विस्कळीत असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत तसेच शहरातील अस्वच्छता, त्यामुळे पसरणारी रोगराई, शहरातील वाहतूक कोंडी, त्याचबरोबर कुकडीच्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणेकामी मौजे वरकुटे(मूर्तीचे) येथील सीएसआर फंडातून गाव ओढा रुंदीकरण सरलीकरण करण्याच्या कामाला आर्थिक तरतूद करणे, कामोणे येथील ग्राहकांच्या विनंती अर्जानुसार व तक्रारीनुसार आयडीबीआय या बँकेऐवजी दुसरी कोणतीही राष्ट्रीयकृत बँकेकडे गाव दत्तक द्यावे आधी कामे व्हावीत याबाबत मागणी केली आहे.
● दिग्विजय बागल




