केमची हालगी रायगडावर आवाज घुमवनार!

केम(संजय जाधव): श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही १६ जानेवारीला रायगड किल्ल्यावर संभाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये करमाळा तालुक्यातील केमचा उत्तरेश्वर हलगी ग्रुप सहभाग घेऊन हलगीचा आवाज रायगडावर घुमवणार आहे.
मागील दहा वर्षांपासून हा राज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्यात दरवर्षी राज्यातील विविध मान्यवरांच्या हस्ते जलाभिषेक करून हा सोहळा संपन्न होत असतो. यामध्ये स्वराज्यातील सरदारांचे वंशंज, समाजातील कर्तृत्ववान महिला, वारकरींच्या भक्ती-शक्ती स्वरूप, रायगडावर वर्षानुवर्ष वास्तव्यास असलेले मावळे,कुस्तीचा फड गाजविणाऱ्या मल्लांचा ‘मर्दानी राजा’, शेतकऱ्यांचा ‘पोशिंदा राजा’ या आदींचा समावेश असतो. यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यलढ्यात आपल्या जिवाची तमा न बाळगता लढा देणाऱ्या क्रांतीकारकांच्या वंशंजाच्या हस्ते भारताच्या विविध राज्यातील पवित्र नद्यांच्या जलाभिषेकांने हा सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्यास महाराष्ट्रातून अनेक युवक युवती उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात यामध्ये ढोल ताशांच्या व हलगीच्या गजरात मोठा जल्लोष केला जातो. या सोहळ्यामध्ये केम येथील उत्तरेश्वर हलगी ग्रुप मोठ्या उत्साहाने सहभागी होणार असल्याची माहिती या ग्रुपच्या सदस्यांकडून देण्यात आली.
- यंदाच्या जलाभिषेकांचे मानकरी
- श्री.किरण जीत सिंग हुतात्मा सरदार भगत सिंग यांचे पुतणे
- श्री.अँड.भाई सुभाष भगवानराव पाटील क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नातू
- श्री. सत्यशिल कमलाकर राजगुरू हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे नातू
- श्री. सज्जनराव शामराव पाटील स्वातंत्र्य सैनिक गोवा मुक्ती संग्राम १९५५
- श्री. गौरव किरण नायकवडी क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांचे नातू
- श्री. दिग्विजय सर्जेराव जेधे स्वातंत्र्यसैनिक देशभक्त केशवराव जिथे यांचे पणतू
- श्री.संजीव जावळे सशस्त्र क्रांतिकारक सार्वजनिक गणेशोत्सवाचे आद्य संस्थापक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे यांचे पणतू




