मांगी शिवारात बिबटयाचे दर्शन ? – परिसरात दहशत
करमाळा (दि.१६): आज मांगी परिसरात अकरा वर्षाच्या मुलाला अचानक सकाळी बिबट्यासदृश प्राणी दिसला तसेच धाडसाने त्याने सदर प्राण्याचे आपल्या मोबाईल मध्ये शूटिंग देखील काढली. हा व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये व्हायरल झाल्याने मांगीसह परिसरातील गावांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झालेली आहे. (हा व्हिडिओ बातमीच्या खाली दिलेला आहे.)
गेल्या महिन्याभरापासून बिबट्या मांगी परिसरात फिरत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत होते. मांगी परिसरातील अनेक शेळ्या मेंढ्या देखील या बिबट्याने फस्त केल्याची तक्रार ग्रामस्थांनी वन विभागाकडे केलेली आहे. पंधरा दिवसा खाली बिबट्याचे ठसे वनअधिकारी घेऊन गेले होते परंतु त्यानंतर वन विभागाकडून बिबट्या पकडण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात नव्हती आली.
आज (दि.१६) मांगी येथील ऊस तोड कामगारांचा ११ वर्षांचा मुलगा दिपक कचरू ठाकरे हा शेतकरी शरद शिंदे यांच्या शिवारात सकाळी सव्वा आठ च्या दरम्यान प्रातर्विधीला गेला होता. यावेळी पन्नास फूट अंतरावर त्याला बिबट्यासदृश्य प्राणी जाताना दिसला. त्यावेळी त्याने त्याचे आपल्या जवळील मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग सुद्धा घेतले.बिबट्या सदृश प्राणी दूर गेल्यानंतर त्याने मांगी गावात येऊन ही माहिती मांगीचे सोसायटी चेअरमन सुजित बागल यांना दिली. यानंतर बागल यांनी तात्काळ वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही माहिती दिली.
या बिबट्यामुळे परिसरातील लोकांचे दैनंदिन जीवन हे दहशतीखाली सुरू असून शेतीचे कामामध्ये अडथळा येत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. तसेच या बिबट्याला तातडीने पकडावे अशी मागणी मांगीसह परिसरातील ग्रामस्थांनी केलेली आहे.
याबाबत सुजित बागल म्हणाले की, गेली महिनाभरापासून बिबट्या मांगी शिवारास वास्तव्यास आहे. आज त्याने शरद शिंदे यांच्या शेतात मुक्काम ठोकलेला आहे. मात्र आमची दखल वन अधिकारी घेत नाहीत या पुढील बिबट्याने काळात कोणाचा जीव घेतला तर याला सर्वस्वी जबाबदार वन अधिकारी राहतील असे ते म्हणाले.
मांगी परिसरात बिबट्या वास्तव्यस असताना सुद्धा वनाधिकारी एक महिन्यापासून शांत झोपले आहेत. आज अकरा वर्षाच्या मुलाने व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बिबट्याचे लाईव्ह लोकेशन दाखवले आहे तरीसुद्धा वन अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत ते जबाबदारी टाळून करमाळा तालुक्यात बिबट्या नाही असा दावा करत आहेत. त्यामुळे शासनाने अधिकार्यांना बदलून नवीन कार्यक्षम वनाधिकारी द्यावे.
● महेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख,करमाळा