कर्जमुक्त कारखाना अधोगतीस जाण्यास जगताप, पाटील जबाबदार - चंद्रकांत सरडे -

कर्जमुक्त कारखाना अधोगतीस जाण्यास जगताप, पाटील जबाबदार – चंद्रकांत सरडे

0

करमाळा(दि.९) : आदिनाथ सहकारी साखर कारखाना सन २००० साली तत्कालीन आमदार आणि माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांनी पूर्णपणे कर्जमुक्त केला होता. मात्र नंतरच्या काळात काहींमुळे हा कारखाना आर्थिक गर्तेत सापडला. आता पुन्हा हा कारखाना पूर्ववत मार्गावर आणण्याची क्षमता केवळ माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडेच आहे, असे ठाम प्रतिपादन आदिनाथ बचाव महायुती पॅनलचे उमेदवार आणि माजी व्हा. चेअरमन चंद्रकांत सरडे यांनी केले. महायुतीच्या साडे येथे पार पडलेल्या प्रचारसभेत सरडे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजयमामा शिंदे, पॅनलमधील सर्व उमेदवार, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, माजी चेअरमन वामनराव बदे, ज्येष्ठ नेते गोकुळबापू पाटील, सरपंच समाधान दोंड यांच्यासह पॅनलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरडे म्हणाले की, २००० साली कर्जमुक्त झालेला कारखाना २००१ मध्ये जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या पॅनलकडे गेला. सुरुवातीला कारखाना व्यवस्थित चालला, पण पुढे काही राजकीय हस्तक्षेपामुळे परिस्थिती ढासळली. ऊस उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला आणि गाळप कमी होऊ लागले. त्यामुळे कारखान्याच्या अधोगतीस सुरुवात झाली. यासाठी जयवंतराव जगताप व नारायण पाटील जबाबदार आहेत, असा आरोप सरडे यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, आदिनाथ कारखान्याच्या पुनर्बांधणीसाठी आणि ऊस उत्पादकांचे हित साधण्यासाठी संजयमामांकडे अनुभव आणि क्षमता आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती पॅनलला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

आदिनाथचे माजी संचालक विलासकाका राऊत यांनी सभेत बोलताना दहिगाव पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, माजी आमदार संजयमामांनी सुरू केलेली ही योजना विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी अडवली. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्काचा खेळखंडोबा झाला. त्यामुळे आदिनाथ कारखाना सुरू होणे आणि मजबूत नेतृत्व संजयमामांकडेच असणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सुलेखन – प्रशांत खोलासे, केडगाव (ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!