टाकळी येथे घरफोडीची घटना – सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरीला

करमाळा (दि. १): तालुक्यातील टाकळी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे ₹2,53,000/- किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रल्हाद महादेव दोडमिंसे (वय 31) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

28 जुलैच्या रात्री दोडमिंसे कुटुंबातील सर्व सदस्य जेवणानंतर झोपले होते. प्रल्हाद, त्यांची पत्नी आणि मुलगा बेडरूममध्ये झोपले होते, तर आई-वडील हॉलमध्ये झोपले होते. सकाळी 5 वाजता त्यांच्या आईने आवाज देऊन बेडरूममधील कपाट उघडं असल्याचे व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे सांगितले. दरम्यान, बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे लक्षात आले. आईने दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता, दुसऱ्या बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दरवाजे उचकटलेले दिसले व कपाटातील लॉकरमधील सोन्याचे दागिने व रोख ₹15,000/- रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये –
1. अंदाजे ₹1,75,000/- किंमतीचे साखळीतील अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठन,
2. ₹35,000/- किंमतीची अर्धा तोळ्याची ठुसी,
3. ₹28,000/- किंमतीचे ४ ग्रॅमचे दोन सोन्याचे वेल,
4. ₹15,000/- रोख रक्कम
असा एकूण ₹2,53,000/- किमतीचा ऐवज आहे.

दोडमिंसे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


