करमाळ्यात तालुक्यातील बोगस डॉक्टरवर छापा — बनावट पदवी, औषधे व साहित्य जप्त

करमाळा(प्रतिनिधी):करमाळा तालुक्यातील पुनवर गावात गुरुवारी एका बोगस डॉक्टरवर आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. या कारवाईत आरोपीकडून वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारी कोणतीही अधिकृत पदवी किंवा परवाना नसतानाही उपचार करत असल्याचे उघड झाले. घटनास्थळी बनावट पदवी प्रमाणपत्रासह मोठ्या प्रमाणात औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई ३० जुलै २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता करण्यात आली. कारवाई पथकात गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, आरोग्य अधिकारी अक्षय जोरी, पोलीस कर्मचारी आरकिले, चालक सागर सोरटे सहभागी होते.

जप्त सामग्रीमध्ये काय?
छाप्यात बनावट वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र, इंजेक्शन, गोळ्या, सलाईन बाटल्या, वैद्यकीय उपकरणे आणि मोठ्या प्रमाणातील औषधांचा साठा आढळून आला.
आरोपी कोण?
या प्रकरणात समीर पूर्णा मंडल (रा. बारासाल, पश्चिम बंगाल) याच्यावर Medical Practitioners Act 1961 च्या कलम 33 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियमाचे विविध कलमे लागू करण्यात आली आहेत.

या प्रकारामुळे ग्रामीण भागात रुग्णांच्या आरोग्याशी होत असलेली खेळवाड उघड झाली आहे. अशा बोगस डॉक्टरांवर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अशी व्यक्ती अनेक वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत होती, ही बाब धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया मिळाली आहे.


