तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सरपडोह शाळेचा संघ खो-खो मध्ये सलग तिसऱ्यांदा विजेता

करमाळा : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सरपडोह येथील खो-खो (मुले) मोठा गट संघाने अतुलनीय कामगिरी करत सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. शाळेच्या साक्षी खराडे हिने बुद्धीबळ (मोठा गट) स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढवला.

स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांनी कडवी टक्कर दिली; मात्र सरपडोहच्या खो-खो संघाने उत्कृष्ट रणनीती, वेग, चपळाई आणि शिस्त यांच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. अनेक महिन्यांच्या कठोर सराव, नियमित फिटनेस प्रशिक्षण आणि प्रशिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हा विजय शक्य झाल्याचे संघाने सांगितले.


शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि पालकांनी खेळाडूंना दिलेले सातत्यपूर्ण प्रोत्साहन हे या यशामागील महत्त्वाचे घटक ठरले. या विजयानंतर सरपडोह शाळेला तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात वेगळे स्थान प्राप्त झाले असून खेळाडू आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.
याबाबत गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, विस्तार अधिकारी नलवडे, टकले व शिक्षिका जगताप यांनी संघाचे अभिनंदन केले असून सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मैदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
शाळेला योग्य असे मैदान नसल्याने खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत होता. दोन वर्षांपूर्वी शिक्षकांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांनी स्मशानभूमीच्या शेजारी मुरूम टाकून खो-खोचे मैदान निर्माण केले. यावर्षी मैदानावर लाल माती टाकण्यात आल्याने सरावासाठी योग्य सुविधा उपलब्ध झाल्या. या स्थानिक प्रयत्नांमुळे संघाला उत्कृष्ट तयारी करता आली आणि यशाची घोडदौड साधता आली.

