समाजमन घडविणारे शिक्षक-स्व.सुखदेव साखरे - Saptahik Sandesh

समाजमन घडविणारे शिक्षक-स्व.सुखदेव साखरे

विद्येचा प्रांगणात राहून,माणुसकी पेरणारा आणि समाजमन घडविणारा  शिक्षक….म्हणजे स्व.सुखदेव साखरे (सर) होय..
काही माणसे वयाने ज्येष्ठ होतात,काही पदानं मोठी होतात … पण काही माणसं आपल्या विचारांने, आचाराने आणि त्यागाने मोठी होतात.एवढेच नव्हेतर अनेक माणसं जन्माला येतात आणि संसार करता करताच निघून जातात..पण काही माणसं आपल्या कार्याने, विचारांने  आणि कर्तृत्वाने वेगळेपण सिद्ध करतात. स्व. साखरे सर, हे त्याच परंपरेतील  एक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी संपुर्ण हयातभर शेती, गाव आणि शाळा यावर लक्ष केंद्रित करुन  विकासात्मक कार्य केले. सर्वसामान्य माणसात राहुन त्यांनी राजेश्वर विद्यालय आणि विद्यार्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयुष्य वेचले.

शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकातील धडे देणे नव्हे; तर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न जागवणे, त्यांच्या स्वप्नांना दिशा देणे, त्यांच्या सुप्त गुणांना संधी देणे आणि त्यांच्यातील माणूस अधिक संवेदनशील बनवणे या व्यापक जाणीवेने त्यांनी आपले शैक्षणिक कार्य केले. आपल्या शैक्षणिक प्रवासाला एक अर्थ दिला. राजेश्वर विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या विकासात्मक वाटचालीत मित पण कणखर भाषेत त्यांनी ठोस आणि ठाम कार्य केले. विद्यार्थी हा केवळ परीक्षेसाठी नाही तर भविष्यासाठी तयार व्हावा, यासाठी त्यांची विलक्षण तळमळ होती. काही माणसं निघून जातात; पण त्यांच्या विचारांची संस्कारांची आणि ज्ञानाची सेवा कधीच निवृत्त होत नाही.

त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात पेटवलेला ज्ञानदीप काळाच्या अनेक पिढ्यांना उजळत राहील.अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये विद्येचा प्रकाश, माणुसकीचा सुगंध पेरणाऱ्या आणि समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये समाजमन घडविणाऱ्या या महान आत्म्याच्या द्वितीय पुण्यस्मरना निमित्त विनम्र अभिवादन

✍️ निलेश दुरंदे 9420544294

error: Content is protected !!