भारत प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

करमाळा (प्रतिनिधी): जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, शिक्षक केवळ शिक्षण देत नाहीत तर विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी निर्माण करतात, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.



नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष अध्यापनाला पर्याय नाही. मोबाईल व संगणकाच्या युगातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली. यामध्ये विद्यार्थ्यांमधूनच एका विद्यार्थ्याची मुख्याध्यापक म्हणून निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी काही काळ शाळेतील विविध वर्गांमध्ये अध्यापनाचे कार्य केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे गणवेश परिधान करून शिक्षक दिनाचा अनोखा अनुभव घेतला.



कार्यक्रमास मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, अमोल पाटील, अनिता देशमुख, किशोर गुळमे, वर्षा भोसले, उत्तरेश्वर गरड, अनंत पाटील, अमोल हजारे, निंबाळकर मॅडम यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. विस्तार अधिकारी डॉ. नितीन कदम यांनीही शाळेला आवर्जून भेट देऊन कार्यक्रमाची पाहणी केली.

शाळेत शिक्षक दिनाच्या कालावधीत दहीहंडीसह विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

error: Content is protected !!