स्वतःच कर्ज घेऊन मदत करणारा अवलीया..
अंध दांम्पत्याला सहानुभूती नव्हेतर थेट मदत..

करमाळा:आजच्या काळात बँकेत किंवा पतसंस्थेत कर्ज काढायचे म्हटले की जामीनदार मिळणे हीच मोठी अडचण झाली आहे. कारण कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर त्याची जबाबदारी जामीनदारावरही येते. त्यामुळे दुसऱ्याच्या कर्जाला जामीन राहण्यास अनेकजण तयार होत नाहीत. अशा परिस्थितीत दुसऱ्याला मदत करण्यासाठी जामीनदार होण्यापेक्षाही पुढे जाऊन स्वतःच्या नावावर कर्ज काढून ते पैसे दुसऱ्याला देणे, ही निश्चितच वेगळी आणि धाडसी गोष्ट म्हणावी लागेल.
अशाच प्रकारची माणुसकीची भूमिका घेतली ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब गोरे यांनी.



अंध दाम्पत्य ज्योतीराम माने आणि स्वाती माने यांना स्वतःची जागा खरेदी करून घर उभे करायचे होते. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक अडचण त्यांच्या समोर होती. त्यावेळी गोरे गुरुजींनी केवळ त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली नाही किंवा मदतीचे आश्वासन देऊन थांबले नाहीत. त्यांनी थेट कृती करण्याचा निर्णय घेतला.
माने दाम्पत्याला जागा खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपयांची गरज होती. गोरे गुरुजींनी पतसंस्थेतून स्वतःच्या नावावर दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि ते पैसे माने दाम्पत्याला दिले. या पैशातून मुथानगर येथे त्यांनी जागा खरेदी केली.
पुढे त्याच जागेवर घर बांधण्यासाठी माने दाम्पत्याला पुन्हा पैशांची गरज निर्माण झाली. त्यावेळीही गोरे गुरुजींनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी पुन्हा स्वतःच्या नावावर पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि ते पैसे माने दाम्पत्याला दिले.


एकूण सात लाख रुपयांचे कर्ज स्वतःच्या नावावर घेऊन दुसऱ्याच्या घरासाठी देणे , ही आजच्या व्यवहाराच्या जगात निश्चितच साधी गोष्ट नाही. कारण या व्यवहारात गोरे गुरुजींचा स्वतःचा कोणताही स्वार्थ नव्हता. त्यांच्यासमोर केवळ एका अडचणीत असलेल्या कुटुंबाला स्वतःच्या पायावर उभे करण्याचा विचार होता.
विशेष म्हणजे माने दाम्पत्यानेही गोरे गुरुजींनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला. त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली. त्यामुळे या घटनेला आणखी एक वेगळे महत्त्व प्राप्त होते. एका व्यक्तीने विश्वास ठेवला आणि दुसऱ्या व्यक्तीने तो विश्वास जपला. या दोन्ही गोष्टी समाजासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
आज अनेकदा एखाद्याला मदत करायची असेल तर आपण शब्दांनी सहानुभूती व्यक्त करतो. परंतु सहानुभूतीपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज असते, हे गोरे गुरुजींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
बाळासाहेब गोरे यांनी केलेली मदत ही केवळ सात लाख रुपयांची आर्थिक मदत नाही; ती एका कुटुंबाच्या स्वप्नाला दिलेली साथ आणि विश्वासाला दिलेली कर्तृत्वाची जोड आहे.
अशा घटना समाजाला सांगून जातात की, समाज केवळ नियम, व्यवहार आणि पैशांवर चालत नाही; विश्वास ठेवणाऱ्या आणि तो विश्वास जपणाऱ्या माणसांमुळेही समाज उभा राहतो.
