विश्वासाने नावे केलेली जमीन परत मागितल्याने महिलेचा विनयभंग व मारहाण..


करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१५ : विश्वासाचे नातेवाईक म्हणून सन २०१४ मध्ये दीड एकर जमीन नातेवाईकाच्या नावे केली होती. सदर जमीन पुन्हा आपल्या नावे करून देण्याची मागणी केल्याच्या कारणावरून दोघांनी महिलेला शिवीगाळ करून विनयभंग करत मारहाण केली. तसेच सोडविण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनाही दगडाने मारहाण केली आहे. ही घटना १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता घोटी येथे घडली.

याबाबत संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सन २०१४ मध्ये भीतीपोटी व लोक त्रास देतील म्हणून विश्वासाचे नातेवाईक भरत मारुती शेंडे (रा. घोटी) यांच्या नावे दीड एकर जमीन केली होती. तेव्हापासून सदर जमिनीमध्ये आमचीच कब्जेवहीवाट आहे.मात्र, गेल्या काही दिवसांपासून सदर जमीन पुन्हा आमच्या नावे करून देण्याची मागणी केली असता भरत शेंडे यांनी जमीन परत करून देण्यास नकार दिला.

या जमिनीच्या वादाबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे प्रकरण नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी संबंधितांनी एकत्रित बैठक घेऊन त्यातून काय निर्णय होतो, ते पाहून आपल्याला कळवावे, असे सांगितले होते. त्यानुसार १४ सप्टेंबर रोजी गावातील सरपंच विलास काका पाटील यांच्या घरी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भरत शेंडे यांनी जमीन देण्यास नकार दिला. बैठक संपल्यानंतर बाहेर आल्यानंतर फिर्यादी महिलेने ‘ही जमीन आम्हाला परत द्या’, असे म्हटले असता भरत मारुती शेंडे याने ‘तू माझे काय करणार?’ असे म्हणत तिच्या छातीला धरून अंगावरील कपडे फाडून मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच तिला सोडविण्यासाठी आलेले नातेवाईक मोहन मारुती शेंडे, तसेच दीर व चुलत सासरे यांनाही भरत मारुती शेंडे व त्याचा मुलगा वैष्णव भरत शेंडे यांनी शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली.
या प्रकरणी पोलिसांनी भरत मारुती शेंडे व वैष्णव भरत शेंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!