राज्यातील सत्तांतराचा करमाळा तालुक्यातील विकासकामावर कोणताही परिणाम होणार नाही – आमदार संजयमामा शिंदे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : राज्यामध्ये सत्तांतर झाले असलेतरी करमाळा विधानसभा मतदार संघातील विकासकामावर कोणताही परिणाम होणार नाही. जी कामे सुरू आहेत, ती विकासात्मक कामे आहेत. त्यामुळे त्या कामांना निधी कमी पडणार नाही व सत्तेतील लोकही आडकाठी करणार नाहीत; असा आत्मविश्वास आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला.
वाढदिवसानिमित्त सा. कमलाभवानी संदेशशी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, की राजकारणामध्ये मोठ्या मनाची माणसे असतात. त्यामुळे विकासात्मक कामाला कोणत्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत. आगामी कालावधीत दहिगावचे व्यवस्थापन परिपूर्ण करणे तसेच कुकडीचे पाणी नियमित तालुक्याला मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच जातेगाव ते टेंभूर्णी रस्त्याचे टेंडर परिपूर्ण निघेल; यातही कोणती शंका नाही. ठरल्याप्रमाणे डिकसळ पुलाचेही काम लवकरच पूर्ण होईल, असेही आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले.
करमाळा तालुक्यामध्ये युवकांच्या हाताला काम देण्यासाठी वेगवेगळ्या व्यवसायाचे धोरण समोर आहे. सुतगिरणीच्या बाबतीत केंद्र शासनाचे धोरण बदलत आहे. सदरचे धोरण बदलताच त्याचा फायदा घेऊन तालुक्यात सुतगिरणी, होजिअरी सारखे प्रकल्प उभा करण्याचा मानस आहे.
करमाळा तालुक्यामध्ये गटातटाचे राजकारण पूर्वीपासून आहे. त्यानूसार माझ्या सोबत माजी आमदार जयवंतराव जगताप हे आहेत. आम्ही दोघे एकत्र काम करत आहोत. आगामी कालावधीत येणाऱ्या सर्व निवडणुकात सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सर्वांना समान न्याय देण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, आदिनाथ कारखाना तसेच इतर स्थानिक संस्था यामध्ये कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. नगरपालिकेमध्येही समविचारी व्यक्तींना बरोबर घेऊन निवडणूक लढवली जाईल. नगरपालिकेसाठी १० कोटी रूपयाचा निधी मंजूर झालेला आहे. नव्याने डीपीआर दिलेला होता, परंतू शासन बदलल्यामुळे त्याला मंजुरीस वेळ लागणार आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील विकासात्मक कामासाठी समक्ष संपर्क करावा. त्यानूसार तातडीने कामे करणे शक्य होणार आहे. – संजयमामा शिंदे (आमदार, करमाळा)