श्री राजेश्वर विद्यालयांमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : राजुरी (ता.करमाळा) येथील श्री राजेश्वर विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला वैजनाथ स्वामी सेवा मंडळाचे संस्थापक सचिव श्री. लालासाहेब गोविंद जगताप, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री.सुखदेव तात्या साखरे, विद्यमान मुख्याध्यापक श्री. अनिल सोपान झोळ, राजुरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.
१५ ऑगस्ट निमित्त प्रशालेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभागी होत शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य व भाषण केले. सन 2002 या शैक्षणिक वर्षातील एस एस सी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वितरण करण्यात आले. कै. मारुती संभाजी साखरे यांच्या स्मरणार्थ सौ.कविता साखरे-जगदाळे व कै. भागवत मोरे यांच्या स्मरणार्थ श्री. शरद भागवत मोरे यांच्या वतीने प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती शिंदे व वृषाली शिंदे या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन डी.एस.साखरे यांनी केले.