“दारूचे व्यसन सोडा व पाल्याला शिष्यवृत्ती मिळवा मिळवा” या उपक्रमास सरपडोह येथे प्रतिसाद
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनानिमित्त व करमाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेनुसार “दारूचे व्यसन सोडा व पाल्याला शिष्यवृत्ती मिळवा मिळवून द्या” या संकल्पनेनुसार तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय काका सरडे यांच्या मातोश्री यांच्यास्मृतिदिनानिमित्त दारूचे व्यसन सोडणाऱ्या व्यक्तीच्या पाल्यास पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
त्यानुसार सरपडोह गावातील रमेश गोविंद जानभारे यांना ही माहिती सविस्तर सांगण्यात आली ,त्यानुसार त्यांनी त्वरित मान्यता देऊन शपथ घेण्याचे मान्य केले. गावातील आराध्य दैवत श्री सर्पनाथ मंदिरात गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये दारू सोडण्याची शपथ घेण्यात आली, शपथ वाचन नाथराव रंदवे उपसरपंच सरपडोह यांनी केले .यावेळी सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक भाऊसाहेब,पोलीस पाटील, सोसायटी चेअरमन,मुख्याध्यापक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या या संकल्पनेचे ग्रामस्थांनी कौतुक केले, ही संकल्पना अतिशय समाज उपयोगी आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.