केम व जेऊर रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबा मिळावा यासाठी खासदारांनी दिले रेल्वे मंत्र्यांना निवेदन
केम ( प्रतिनिधी – संजय जाधव ) : करमाळा तालुक्यातील केम व जेऊर रेल्वे स्थानकावर रेल्वेना थांबा मिळावा यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी काल (दि.१२) रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून निवेदन दिले आहे.
केम रेल्वे स्थानकावर पूर्वी चालू असलेल्या व कोरोनामध्ये बंद झालेल्या गाड्या पूर्ववत कराव्यात अशी मागणी गेल्या अनेक महिन्यापासून केम ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या गाड्या चालू नसल्याने विद्यार्थी, प्रवासी व व्यावसायिक, सर्वसामान्य लोकांना फटका बसतो आहे. खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या केम मध्ये झालेल्या भेटीदरम्यानही केम ग्रामस्थांनी ही मागणी लावून धरली होती.
यानुसार खासदारांनी रेल्वे मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात हैदराबाद-मुंबई ( १७०३१-१७०३२) , सोलापूर पुणे डेमो पेसेंजर, ११०२७-११०२८ मेल गाडी या रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्वी चालू असलेले कोरोना कालावधीत बंद झाले होते, ते पुन्हा चालू करावेत तसेच कन्याकुमारी- पुणे (१६३८२) या गाडीला केम स्टेशनवर थांबा मिळावा असे नमूद केले आहे.
याचबरोबर जेऊर रेल्वे स्टेशनवर कोणार्क एक्सप्रेस (११०१९-११०२०), चेन्नई – मुंबई
एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळावा अशी देखील मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे.
केम येथे गाड्यांना थांबा मिळाल्यानंतर केम ग्रामस्थांच्या वतीने खासदार नाईक निंबाळकर यांची मोठी जंगी मिरवणूक काढू असे केम प्रवासी संघटनेने सांगितले.