महाराष्ट्राची संस्कृती जपणारा भोंडला सांस्कृतिक कार्यक्रम मलवडी शाळेत संपन्न
केम (प्रतिनिधी -संजय जाधव) : भोंडला हा महाराष्ट्राची संस्कृती जपणारा एक पारंपारिक खेळ आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने हा खेळ ओळखला जातो. याला कुठे हादगा म्हणतात तर काही ठिकाणी भोंडला असं म्हटलं जातं. अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते .अश्विन महिन्यात सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करतो. हस्त नक्षत्र प्रतिक म्हणून हत्तीची पूजा केली जाते. हत्तीचे चित्र काढून किंवा मूर्ती ठेवून त्या भोवती फेर धरून वेगळी मराठी लोकगीते गायली जातात. महाराष्ट्रातील समाज जीवन अंतर्गत परिसर अभ्यास या विषयातील उपक्रम म्हणून भोंडला पारंपारिक खेळ या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी येथील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन या खेळाचा आनंद द्विगुणीत केला.
महाराष्ट्रातील लोकजीवनाचा प्रत्यक्ष अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व उपाध्यक्ष, सर्व सदस्य , महिला वर्ग मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका पाटेकर मॅडम श्रीमती राणी सातव,उर्मिला खिळे ,श्री शंकर ननवरे, केशव देवकर , रेवणनाथ देवकर यांचे सहकार्य लाभले.