आवाटी सबस्टेशन 6 महिन्यात कार्यान्वित होणार - 2 कोटी 37 लाख निधी मंजूर - आ.संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

आवाटी सबस्टेशन 6 महिन्यात कार्यान्वित होणार – 2 कोटी 37 लाख निधी मंजूर – आ.संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा :
कोळगाव धरण परिसरातील विजेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून अखेर तो कायमस्वरूपी सुटणार आहे, आवाटी सबस्टेशन 6 महिन्यात कार्यान्वित होईल व या परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा शाश्वत फायदा होईल अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याबाबतीत अधिक माहिती देताना आमदार श्री.शिंदे म्हणाले की, गेल्या 2 वर्षापासून कोळगाव धरण 100% भरत असल्यामुळे या परिसरातील गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती ऊस ,केळी आदी बारमाही पिकांची लागवड झालेली आहे. असे असूनही सबस्टेशन वरती अतिरिक्त लोड असल्यामुळे पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नव्हता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची नवीन सबस्टेशनची मागणी अनेक दिवसापासून सुरू होती. या मागणीला मूर्तस्वरूप प्राप्त झाले असून, आवाटी येथे नवीन सबस्टेशन उभारणी साठी दोन कोटी 37 लाख रुपये निधीची तरतूद झालेली असून या कामाचा कार्यारंभ आदेश 28 सप्टेंबर 2022 रोजी निघालेला आहे.

धरण उशाला असूनही कमी दाबाने मिळणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे येथील नागरिकांच्या घशाला मात्र कोरड होती. अपुऱ्या दाबाने व प्रत्यक्षात 4 तासच या भागात वीज पुरवठा केला जात होता.परंतु आता नवीन सबस्टेशन मुळे हा प्रश्न निकाली निघणार आहे. पूर्वीच्या कोळगाव सबस्टेशन वरती गौंडरे, आवाटी, नेरले, निमगाव ह, हिवरे, कोळगाव धरण असा लोड होता. आता नवीन सबस्टेशन झाल्यामुळे कोळगाव सबस्टेशनवरील लोड कमी होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पुरेशा दाबाने 8 तास वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू होईल.

ऑगस्ट 2020 मध्ये आवाटी येथे सबस्टेशन उभारण्यासंदर्भात आ. संजयमामा शिंदे यांनी पत्रव्यवहार केला आणि त्याला 2 वर्षाच्या कालावधीतच मूर्तस्वरूप प्राप्त झाल्यामुळे या परिसरातील नागरिक आमदार संजयमामा शिंदे यांचे आभार व्यक्त करत आहेत. नव्याने उभारण्यात येणाऱ्या आवाटी सबस्टेशन वरती कोळगाव धरणासह गौंडरे, आवाटी व नेरले या गावांना वीज पुरवठा केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!