करमाळ्यातील दोन कोटी दहा लाखाच्या अपहार प्रकरणातील एकास अटकपूर्व जामीन मंजूर - Saptahik Sandesh

करमाळ्यातील दोन कोटी दहा लाखाच्या अपहार प्रकरणातील एकास अटकपूर्व जामीन मंजूर

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.१) : करमाळा शहरातील बंधन बँकेमध्ये दोन कोटी दहा लाख रुपयांचा अपहार झालेला होता, या प्रकरणातील आरोपी संजय दगडे यांचा कोणताही सहभाग नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी संजय रखमाजी दगडे यास अटी व शर्तीवर 25 हजार रुपयांच्या जात मचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे, याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड.रितेश थोबडे, ॲड. निखिल पाटील यांनी काम पाहिले.

यात हकीगत अशी की दिनांक 12/02/2021 रोजी करमाळा येथील बंधन बँकेमध्ये दोन कोटी दहा लाख रुपयांचा अपहार झालेला होता, सदर प्रकरणी विनायक गुळप्‍पा तोंनशाळ यांनी करमाळा पोलीस स्टेशन येथे तशी फिर्याद दिली होती.

सदर फिर्यादीमध्ये दिनांक 12/02/2021 रोजी बँकेतून तीस तीस लाखाचे सात ट्रांजेक्शन्स एकूण दोन कोटी दहा लाखाचे झालेले होते, परंतु करमाळा बँकेच्या मिरर अकाउंट मध्ये दाखवत असून प्रत्यक्षात मात्र कसलेही कागद सदर ब्रांच मध्ये उपलब्ध नव्हते सदरची रक्कम संजय रखमाजी दगडे यांचे बँक खात्यात 90 लाख तसेच विलास मधुकर नादरगे पाटील याचे बँक खात्यात एक कोटी वीस लाख व तेथून पुढे महावीर लॉजिस्टिक व अजित लाला जगताप तसेच साई सुपर मार्केट व चिराग शहा यांचे खात्यामध्ये सदरची रक्कम वर्ग झाल्याचे निदर्शनास आलेले होते.

सदर प्रकरणी तत्कालीन बँक व्यवस्थापक राहुल साहेबराव मुंडे ,विलास मधुकर नादरगे पाटील ,संजय रखमाजी दगडे व अजित लाला जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी राहुल साहेबराव मुंडे व अजित लाला जगताप यांना अटक करण्यात आलेली असून, सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर हे करत आहेत.

यातील आरोपी संजय रखमाजी दगडे याने सुरुवातीला बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता, सदरचा अर्ज फेटाळण्यात आला होता तर नंतर त्याने अँड रितेश थोबडे व अँड निखिल पाटील यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती व आरोपीस कोर्टाने अंतरिम जामीन अटी व शर्तीवर मंजूर केलेला होता.

सदर अर्जाची अंतिम सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री सांबरे साहेब यांचे समोर झाली सदर सुनावणी वेळी आरोपीचे वकील श्री रितेश थोबडे यांनी सदरची रक्कम रुपये 90 लाख यातील आरोपी संजय रखमाजी दगडे यांचे खात्यात केवळ काही मिनिटाकरिता जमा झालेली होती.

त्यानंतर सदरची रक्कम चिराग शहा विरार याचे आयसीआयसीआय बँक शाखा विरार पश्चिम या खात्यात वर्ग झालेले असून यातील आरोपीने सदर रकमेतील कोणतीही रक्कम काढून घेतलेली अथवा स्वतः ट्रान्सफर केलेली नसून केवळ सदर घटनेत यातील आरोपीच्या बँक खात्याचा दुरुपयोग आरोपी नंबर एक याने केलेला असून सदर गुन्ह्यात संजय दगडे यांचा कोणताही सहभाग नसल्याचे निदर्शनास आणून दिले सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी संजय रखमाजी दगडे यास अटी व शर्तीवर 25 हजार रुपयांच्या जात मचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला, सदर प्रकरणी आरोपीतर्फे अँडरितेश थोबडे अँड निखिल पाटील यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!