मांजरगाव ते जर्मनी – शेतकरी कुटुंबातील तरुणाचा जिद्दीचा शैक्षणिक प्रवास…
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा :
करमाळा : मांजरगाव (ता.करमाळा) येथील सर्वसाधारण अशा शेतकरी कुटुंबातील अक्षय चव्हाण हा आयटी क्षेत्रातील प्राविण्याच्या जोरावर मांजरगाव (ता.करमाळा) ते जर्मनी प्रवास करत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मराठी माध्यमातून शिक्षणाचा श्री गणेशा करून आज जर्मन भाषेतील प्रवेश परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन मास्टर डिग्री चे शिक्षण घेण्यासाठी परदेशात जात आहे.
कोणत्याही इंग्रजी माध्यमाचा गंध नसताना, आज आयटी क्षेत्रातील मास्टर डिग्रीसाठी जर्मनीतील प्रसिद्ध विद्यापीठात शिक्षणासाठी अक्षय चव्हाण जात आहे. १० वी नंतर चांगले शिक्षण घ्यायचे म्हटले तर कर्जत, बारामती, पुणे सारख्या ठिकाणी जावे लागते तिथे होस्टेल ला राहणे किंवा खाजगी मेस कडे जेवण असे पर्याय निवडावे लागतात परंतु हे सर्व करण्यासाठी खुप खर्च करावा लागतो, त्या कारणात्सव अनेक तरुण शिक्षणा पासुन वंचीत राहतात केवळ जिद्द असणे आवश्यक नसुन त्यासाठी घरच्यांचे अर्थिक पाठबळ पण आवश्यक आहे, परंतु या सर्व गोष्टी वर मात करून आई-वडिलांच्या कष्टाचं सार्थक करून शिक्षणाला योग्य पद्धतीने आत्मसात करून ध्येय गाठण्याच्या उद्देशाने आज यशाच्या शिखरावर जाऊन हा तरुण पोहोचला आहे, यातच गेल्या वर्षी त्याच्या आईचे कोरोनाने निधन झाले या सर्व संकटावर मात करून आज एक चांगला आदर्श ग्रामीण भागातून सर्वांपुढे ठेवला आहे.
मांजरगावच्या शिरापेचात मानाचा आणखी तुरा उच्च शिक्षणापासून वंचीत असणाऱ्या या गावात परदेशवारी करणारा हा तिसरा तरुण चव्हाण परिवारातील एक असल्याने आणखीन एक अभिमानाची गोष्ट आहे, शिक्षणाच्या जोरावर आयटी क्षेत्रात उत्तुंग भरारी मारणारे कॅनडा येथे असणाऱ्या महेश चव्हाण आणि भाग्यश्री चव्हाण यांचे पाठोपाठ अक्षय हा एक चव्हाण परिवारातील व्यक्ती आहे,आज कॅनडा नंतर जर्मनी या देशात मांजरगावच नाव घेऊन गेलेला आहे. त्यास पुढील वाटचालीसाठी सर्व ग्रामस्थांचेवतीने शुभेच्छा देण्यात आल्या.