करमाळा शहरात गुरूनानक जयंती उत्साहात साजरी – रक्तदान शिबिरात ६० जणांचे रक्तदान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरात सिंधी समाजाच्या वतीने गुरूनानक जयंती उत्साहात सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. गुरूनानक जयंतीनिमित्त मागील चाळीस दिवसापासून पहाटे ४ ते ६ पर्यंत सिंधी समाज तर्फे ‘अमृतवेला’ हा कार्यक्रम घेण्यात आला व त्याची सांगता गुरूनानक जयंती दिनी झाली.
गुरूनानक जयंती दिनी गुरूप्रसाद मंगल कार्यालय येथे लंगरचे आयोजन उत्सव समिती तर्फे करण्यात आले होते. गुरूनानक यांच्या प्रतिमेचे पूजन करून लंगर सेवा सुरू करण्यात आली. तसेच यावेळी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात ६० जणांनी रक्तदान केले. लंगर सेवेसाठी करमाळा शहरवासियांनी उत्तम अशी उपस्थिती दर्शवली. गुरूनानक यांच्या विचाराने प्रेरित असा हा सर्वधर्म समभाव या विचाराने जयंती उत्सव समिती तर्फे आयोजित केला होता.
शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती चौक येथे गुरूनानक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते व सिंधी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.