काष्टी ग्रामपंचायतीचे अनुकरणाची गरज – ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांना सुचनेची गरज..
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.19: सध्या राज्यातील बहुतांशी साखर कारखाने सुरू झाले आहेत.ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर गावोगाव रस्त्याची परिस्थिती न पहाता वेगात चालवतात, टेप रेकाॅर्डर जोरात चालू ठेवतात,रस्त्यावर कधीही व कोठेही उभा केला जातो.ट्रॅक्टर ट्राॅलीला रिफलेक्टर नसतात त्यामुळे अंधारात अन्य वाहने धडकून अपघात होतात.
करमाळा तालुक्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत.याबाबत ट्रॅक्टर चालकांना वारंवार सुचना देणे अवश्यक आहे. याबाबत काष्टी ग्रामपंचायतीने जो फलक लावला तो अत्यंत महत्त्वाचा असून त्याचे अनुकरण व कृती प्रत्येक ग्रामपंचायतीने करण्याची गरज आहे.
काष्टी ग्रामपंचायतीने गावाच्या फलकाशेजारीच एक फलक लावला असून त्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालकांना कडक सुचना दिल्या आहेत. त्यात त्यांनी टेप मोठ्याने लावायचा नाही, ट्रॅक्टर रस्त्यावर उभा करायचा नाही, रिफलेक्टर नसताना ट्रॅक्टर रस्त्यावर आणायचा नाही.इंडीकेटर शिवाय रस्त्यावर येऊ नये, वेग मर्यादित असावा जर याशिवाय ऊसाचा ट्रॅक्टर आला तर चालकाला फटाके दिले जातील व कायदेशीर कारवाई केली जाईल.
विशेष म्हणजे कोणत्याही कारखान्याचा ट्रॅक्टर असेल तरी त्याची गय केली जाणार नाही असे म्हटले आहे. या इशार्या मुळे त्या भागात ट्रॅक्टरचालक नियमात चालत आहे. त्यामुळे तेथे अपघात प्रमाण नगन्य आहे.अशी स्थिती येथे येण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे.