वीजपुरवठा सुरळीत करावा - 'मकाई' चे अध्यक्ष दिग्विजय बागल - Saptahik Sandesh

वीजपुरवठा सुरळीत करावा – ‘मकाई’ चे अध्यक्ष दिग्विजय बागल

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : तालुक्यातील अनेक भागातील शेतीपंपाचा वीजपुरवठा वीजवितरण कंपनीने अचानकपणे कोणतीही पुर्वसुचना न देता खंडित केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असुन, प्राधान्याने वीजपुरवठा सुरळीत करावा असे आवाहन मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले. 

याबाबत अधिक बोलतांनी श्री. बागल म्हणाले की, करमाळा तालुक्यातील पुर्व भाग ,कंदर परीसर व इतरत्र वीज वितरण कंपनीने वीज बीलांच्या वसुलीसाठी सरसकट कोणालाही पुर्वसुचना न देता वीजपुरवठा बंद केला आहे. 

वास्तविक त्यामुळे रब्बी पिके कांदा, ज्वारी, त्याचबरोबर ऊसपिकांचेही नुकसान होणार आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वीजपुरवठा बंद केल्याने मुक्या जनावरांचे अतोनात हाल होत आहे. वीजमंडळाने आपल्या बिलांच्या वसुलीसाठी सरकट वीज बंद करणे ही बाब गंभीर व चुकीची आहे. 

वास्तविक पाहता वीज कंपनीने शेतकऱ्यांना पुर्वसुचना अथवा नोटीस द्यायला हवी होती. परंतु कालपासून कंदर वीज उपकेंद्र अचानक पणे बंद केले गेले. तसेच पुर्व भागातही गौंडरे,कोळगाव, या गावातील वीज डि.पी.बंद केले आहे. तसेच तालुक्यातील पश्चिम भाग रावगांव,मांगी, पोथरे या भागातही शेतकरी धास्तावले आहेत. कोरोना,अतिवृष्टी व सातत्याने हवामान बदलामुळे शेतकरी पुरता  अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांनीही वीज बील वेळेवर भरणे गरजेचे आहे. परंतु सरसकट वीज बंद करु नये. 

शेतकरी नुकताच अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय.पाणी सर्वत्र मुबलक असतांना आता वीजमंडळाच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. याबाबत तातडीने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार सहानभूती पुर्वक करून वीज पुरवठा तातडीने सुरू करावा असे श्री.बागल यांनी म्हटले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!