जिजाऊंच्या आदर्शावर आधारीत समाजप्रणाली निर्माण करण्यासाठी विधवा प्रथा कायमची बंद झाली पाहिजे : प्रा.डाॅ.संजय चौधरी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : समाजातील विधवा प्रथा कायमची बंद करुन महिलांच्या सन्मानास सर्वोच्च प्राधान्य दिल्यास जिजाऊंच्या आदर्शावर आधारीत समाजप्रणाली कार्यरत होईल, घराघरांमध्ये जिजाऊंचा अधिवास पहायला मिळेल असे प्रतिपादन प्रा.डाॅ.संजय चौधरी यांनी केम येथे बोलताना केले.
केम ता.करमाळा येथे राजमाता जिजाऊमाँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.या जयंती उत्सवात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात प्रा.डाॅ.चौधरी बोलत होते.शेतकरी चळवळीशी निगडीत असलेले आदर्श गोपालक परमेश्वर तळेकर यांनी आयोजित केलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सर्जेराव बिचीतकर होते.यावेळी व्यासपीठावर दत्तात्रय फराडे (टेंभुर्णी), सत्यवान सुर्यवंशी,सुनिल तळेकर (जेऊर ), बिभिषण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातील संघर्षमय प्रसंग सांगून पुढे बोलताना डाॅ.चौधरी म्हणाले की,चुकीच्या रूढी-परंपरांना फाटा देवून जिजाऊ माँसाहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडविणा-या जिजाऊ माँसाहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे.येणारा काळ अत्यंत कठीण असणार आहे. या नव्या काळातील नवनवी आव्हाने पेलताना दैवावर विसंबून न राहता प्रयत्नपूर्वक अडचणींवर मात करावी लागेल. प्रयत्नवाद शिकविणारी आपली वारकरी परंपरा अभ्यासपूर्वक व सखोलपणे समजून घेण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झालेली आहे पण सद्यस्थितीत आपण संत तुकारामांनी केलेल्या उपदेशाच्या विरोधात चाललो आहोत अशी खंतही प्रा.चौधरी यांनी व्यक्त केली.
परमेश्वर तळेकर यांच्या कार्याची व निरपेक्ष सेवेची दखल घेऊन गाईचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी परमेश्वर तळेकर यांनी आता कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता जिथे आवश्यक आहे तिथे जाऊन आपले अनुभव लोकांना सांगणे गरजेचे आहे.शासनानेही तळेकर यांच्या या कामाची दखल घेऊन गोधन वाढवण्यासाठी काही महत्वकांक्षी योजनेची रुजवात करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कु.सानिका तळेकर हिने गायलेल्या जिजाऊ गीत गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.मान्यवरांचे सत्कार संयोजक परमेश्वर तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आदर्श गोपालक, आदर्श गोसेवक व बैलजोडी जोपासलेल्या शेतकऱ्यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात १५ बैल जोडीधारकांचा व १७ गोपालकांचा सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर जेष्ठ व वयोवृद्ध आधारवड गं.भा.हौसाबाई(आक्का)तळेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या समारंभास केम परिसरातील युवकवर्ग व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.