करमाळा अर्बन बँक निवडणूकीत रंगत- चौघाजणांचे अर्ज बाद
करमाळा,ता.१६: करमाळा अर्बन बँकेच्या निवडणूकीत रंगत वाढली आहे.१५ जागेसाठी २४ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी चारजणांचे अर्ज नामंजूर झाल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. सत्ताधारी कन्हैय्यालाल देवी गटाचे पॅनल बिनविरोध लागण्याची शक्यता आहे.
करमाळा अर्बन बँकेच्या निवडणूकीत साधारणच्या १० जागेसाठी १७ अर्ज दाखल झाले होते. महिलांसाठी राखीव असलेल्या दोन जागांसाठी तीन अर्ज दाखल आले होते. त्यामध्ये सर्वसाधारण जागेवरील तीन व महिला प्रवर्गातील एक असे चार अर्ज नामंजूर झाले आहेत.
यामध्ये सर्वसाधारण जागेवर दाखल झालेल्या उमेदवारांची नावे प्रज्वला दोशी, दिलीप कटारे, सुनीता देवी, महादेव फंड, राजकुमार दोशी, मोहिनी भणगे, चंद्रकांत चुंबकळकर, काझी कलीम अब्दुल रशीद, कन्हैयालाल देवी, सुनील घोलप, प्रकाश सोळंकी, नंदिनी घोलप, सुहास घोलप, अभिजित वाशिंबेकर, आशा क्षीरसागर, लक्ष्मण क्षीरसागर व सचिन सरडे यांचे अर्ज आले होते. त्यापैकी सुहास घोलप, नंदिनी घोलप व सचिन सरडे यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. थकित कर्ज, 25 हजार रूपये ठेव व भागभागडवल नाही या कारणांमुळे हे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधीसाठी एक जागा राखीव आहे. त्यासाठी चंद्रकांत चुंबळकर व अभिजित वाशिंबेकर यांचे अर्ज दाखल आहेत यात तडजोड झाली तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते. महिला प्रतिनिधीसाठी दोन जागा राखीव असून त्यासाठी सुनीता देवी, प्रज्वला दोशी व नंदिनी घोलप यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यातील घोलप यांचा अर्ज नामंजूर झाला आहे. त्यामुळे महिलांचे सध्यातरी दोन जागेसाठी दोनच अर्ज राहीले आहेत. अनुसूचित जाती/ जमाती प्रतिनिधीसाठी एक जागा राखीव असून येथे वंदना कांबळे यांचा एकमेव अर्ज आला आहे. तर भटक्या विमुक्त जाती/ जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीसाठी एक जागा राखीव असून येथे गोरख जाधव यांचा एकमेव अर्ज आला आहे. एकंदरीत सदरच्या स्थितीत ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे हे काम करत आहेत.
नामंजूर अर्जाबाबत अपील करणार- सुहास घोलप
आपले अर्ज नामंजूर झाल्यानंतर बोलताना सुहास घोलप म्हणाले, ‘बँकेवर आरबीआयचे निर्बंध आहेत. त्यामुळे आम्हाला नियमानुसार ठेव ठेवता आलेली नाही. आम्ही ठेव व भागभांडवल ठेवण्यास तयार होतो व आहोत. या निर्णयाविरुद्ध आम्ही अपील करणार आहोत.’