मी पाहिलेला १९७२ चा दुष्काळ - Saptahik Sandesh

मी पाहिलेला १९७२ चा दुष्काळ

1972 साली देशात फार मोठा दुष्काळ पडला होता त्याची तीव्रता महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक होती. अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अन्नधान्य थोड्या ही प्रमाणात पिकली नव्हती. पूर्वी शेतकरी आपल्याला वर्षभर पुरतील एवढेच अन्नधान्य पिकवत असे त्यामुळे अशा दुष्काळाला तोंड देण्यासाठी जवळजवळ 90 टक्के जनतेकडे अन्नधान्य नव्हते आणि राज्याच्या कोठारामध्ये देखील अन्नधान्याचा साठा मुबलक नव्हता. अशा गंभीर परिस्थितीत परदेशातून लाल गहू,ज्वारी मागवण्यात आली होती. अर्थात हे त्या देशातील डुक्कराचे खाद्य आहे असे मानले जायचे. परंतु पोटाची भूक भागवण्यासाठी भारतीय जनता त्याचा आनंदाने स्वीकार करत असे.

1972 Draught in Maharashtra

हे धान्य मिळवण्यासाठी प्रत्येक नागरिकांना शासनाने नेमून दिलेली कामे म्हणजेच पाझर तलाव, सामुदायिक विहिरी खोदणे ,नाला बल्डींग, जुन्या विहिरी दुरुस्त करणे,रस्ते तयार करणे अशी कष्टाची कामे करावी लागत. मी साधारण पाच ते साडेपाच वर्षाचा होतो वयाने लहान असलो तरी या दुष्काळाची झळ मी प्रत्यक्ष पाहिलेली होती.

आमच्या गावामध्ये (नेरले – ता.करमाळा) एक पाझर तलावाचे काम चालू होते.गावातील लोक तेथे कामाला जात होती. गावात फक्त वृद्ध व्यक्ती आणि घरंदाज घरातील व्यक्ती गावात असे बाकी सर्व लहान मुलासहित तळ्यावरती कामाला जात होती. हे काम अतिशय कडक उन्हामध्ये चालत असे. आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडाच्या सावलीमध्ये वृद्ध बायका आणि लहान मुले यांची सोय केली जात असे . वृद्ध बायका व पुरुष लहान मुलांची देखभाल करण्यासाठी कामाला येत होती. मी स्वतः चुलत भावंडांना सांभाळण्यासाठी तळ्यावरती जात होतो.

छोट्या छोट्या झाडाला झोळया बांधलेल्या व त्यामध्ये लहान मुले झोपून त्यांच्या आया माती उचलण्यासाठी कामावर जायच्या. दहा दहा लोकांचा एक ग्रुप अशा पद्धतीने ग्रुप केले जायचे त्या ग्रुपच्या प्रमुखाला गेंगर म्हटले जायचे,ज्याचं काम जास्त होईल त्यांच्या ग्रुपला रोजगार जास्त मिळायचा. पुरुष मंडळी माती खोदून घमेल्यात भरायचे व भलीमोठे घमेले  बायकांच्या डोक्यावरती द्यायचे,बायका कमरेत वाकत ठराविक अंतरावरती जाऊन माती टाकत. कितीही जास्त काम केलं तरी एक रुपया 50 पैसे पेक्षा जास्त रोजगार कुठल्याही ग्रुपला मिळत नसे.

खड्ड्याची मापे घेणारा साहेब कधी कधी मापे कमी लावत असे. एकदा माझ्या वडिलांच्या कामाचे माप बोधले साहेबांनी कमी लावले माझे वडील चौथी शिकलेली असल्यामुळे त्यांना निमकी, पावकी, अडीचकी येत होती त्यामुळे त्यांनी साहेबांबरोबर वाद घातला तरी साहेब ऐकायला तयार नाही, तेव्हा वडिलांनी टिकावाचा दांडा काढला आणि साहेबाच्या पाठी पळाले तेव्हा गावकऱ्यांनी हा वाद सोडवला .साहेबांनी माझ्या वडिलावरती केस नोंदवली होती परंतु माझ्या आजोबा नामांकित पैलवान सिताराम भांडवलकर यांनी करमाळा येथे जाऊन ती मिटवून घेतली.. माझे वडील एकदा आजारी असल्यामुळे जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी येथे ऍडमिट होते त्यांना भेटण्यासाठी आम्ही वस्तीगृहातील मित्रमंडळी गेलो होतो, त्यावेळेस त्यांच्या रूममध्ये एक पांढरै शुभ्र कपडे घातलेला माणूस आला तो देखील त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास आला होता.त्यांनी माझ्या वडिलांना पाहिलं आणि ‘काय पन्हाळकर ओळखता का?’ असे म्हटले वडिलांनी थोडं निरखून पाहिलं आणि म्हणाले बोधले साहेब का ? त्यावर ते हसले आणि दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या ते निघून गेल्यानंतर वडिलांनी आम्हाला 72 च्या दुष्काळामध्ये त्यांच्याबरोबर घडलेला किस्सा सांगितला.

जनतेला धान्याचे कमतरता भागवण्यासाठी त्याच्यामध्ये शेतात गवत म्हणून उगवणाऱ्या पालेभाज्या गाजर हे मिसळावे लागत होते. आज मी 1972 सालात जन्मलेल्या काही व्यक्तींचा अभ्यास केला तर त्या व्यक्ती अतिशय बौद्धिक क्षमतेने हुशार आहेत.चांगल्या पदावर काम करतात तसेच त्यांचे आरोग्य देखील चांगले आहे याचा मला खूप आनंद वाटतो .हरितक्रांती झाल्यामुळे यापुढे अशा दुष्काळाची परिस्थिती उद्भवणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे, परंतु माणसाच्या हव्यासापोटी भेसळयुक्त अन्नधान्य निर्माण करून आपले आरोग्य धोक्यात आणण्याची भीती संभवते.

यासाठी शाश्वत विकासाची गरज आहे. आज देशामध्ये 30 टक्के अन्नाची नासाडी होते . पुढच्या पिढीचा विचार करायचा झाला तर अन्नाची नासाडी कुठेतरी थांबली पाहिजे जे ताटात आहे ते पोटात गेलेच पाहिजे किंवा जे पोटात घेणार आहे तेवढेच ताटात घेतले पाहिजे,त्याचबरोबर भारतीय आहारालाच प्राधान्य देऊन आपले आरोग्य देखील चांगले ठेवणे गरजेचे आहे. सध्या उपासमारीमुळे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे परंतु अति सेवन आणि अयोग्य आहार यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हे जर टाळायचे असेल तर जरा 72 च्या दुष्काळाकडे वळून पहा आणि त्या काळच्या जनतेने दुष्काळाला दिलेले तोंड आपल्या डोळ्यापुढे ठेवले पाहिजे.

Prof. Dhananjay Panhalkar

✍️ लेखकधनंजय विठ्ठल पन्हाळकर, Mo. 9423303768, नेरले (ता. करमाळा
जि. सोलापूर)

The Drought of 1972 which I have seen | article of Dhananjay Panhalkar from Nerle (Nerale) taluka karmala district solapur Maharashtra| saptahik sandesh| article on 1972 Drought

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!