हैदराबाद एक्सप्रेसच्या बोगींची संख्या कमी – करमाळा तालुक्यातील प्रवाशांचे हाल – ‘हुतात्मा एक्सप्रेस’ला जेऊर येथे थांबा मिळावा..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील प्रवाशांचे सध्या हाल होत असुन, रेल्वेच्या हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेसच्या बोगींची संख्या कमी झाल्याने रेल्वेने जीव मुठीत घरून प्रवास करण्याची वेळ या परिसरातील प्रवाशांवर आली आहे. त्यामुळे हैदराबाद एक्सप्रेसवरील प्रवाशांचा ताण लक्षात घेता हुतात्मा एक्सप्रेसला जेऊर येथे थांबा मिळावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
सोलापुर जिल्ह्यातील करमाळा,माढा तालुक्यातील तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, व नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील लोकांना सोयीचे असलेल्या जेऊर रेल्वे स्टेशनवर नेहमी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.पुण्याला दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.कोरोना काळात हैदराबाद एक्सप्रेस बंद करण्यात आली, त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या स्टेशनवरून पुणे व सोलापुरला जाणार्या प्रवाशांचे हाल होत आहेत सध्या ही एक्सप्रेस सुरू झाली असली तरी जनरल व स्लिपर बोटींची संख्या कमी केल्यामुळे या स्टेशनवरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
फक्त एकच बोगी असल्याने बसण्यासाठी मोठी गर्दी होते यामध्ये चंगराचेंगरीच्या घटनाही होत असून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून जेऊर रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांवर निवारा शेड,गाड्यांना थांबा मिळणे, यासंदर्भात सातत्याने अन्याय होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाले असून हैदराबाद एक्सप्रेस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता या एक्सप्रेसला स्लीपर भोगी ची संख्या वाढवण्याची गरज आहे. याशिवाय नंतर येणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेस ला जेऊर या ठिकाणी थांबा मिळावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील लोकांमधून केली जात आहे या मागणीकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात प्रवासाच्या संदर्भात एखादी दुर्घटना घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जेऊर रेल्वे स्टेशन हे करमाळा तालुक्यातील प्रमुख स्थानक असून या स्थानकावर एखाद्या जंक्शन स्टेशन प्रमाणे प्रवश्यांची आवक – जावक असते, त्यामुळे जेऊर स्थानकावर तातडीने हुतात्मा इंटरसिटी ला थांबा देण्यात यावा व प्रवाश्यांची होणारी फरपड थांबवावी तसेच प्रवश्यांच्या सहनशीलतेचा प्रशासनाने अंत पाहू नये अन्यथा प्रवाशी आक्रमक पवित्रा घेऊ शकतात.
– सुहास सुर्यवंशी (अध्यक्ष रेल्वे प्रवाशी संघटना जेऊर)
हैसदराबाद एक्सप्रेसचा रॅक बद्दला गेला आहे आणि सर्वसामान्य माणूस हा AC ने नाही प्रवास करू शकत आणि त्या रॅकला फक्त दोनच जनरल डब्बे आहेत आणि सकाळी जेऊर मधून पुणे आणि मुंबईला जाणाऱ्याची संख्या भरपूर आहे जर हुतात्मा एक्सप्रेस जेऊरला थांबा मिळाला नाही तर काही तरी अत्यंत दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता आहे रेल्वेनी याची दखल घ्यावी.
– समीर केसकर
हैदराबाद-मुंबई-हैदराबाद या एक्सप्रेसचे स्लीपर क्लास व जनरल डबे कमी केल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे सदर एक्सप्रेसचे डबे पूर्वीप्रमाणे वाढवण्यात यावेत व हुतात्मा एक्सप्रेस ला जेऊर स्थानकावर त्वरित थांबा देण्यात यावा. करमाळा तालुक्यातील 40 -50 गावांना व शेजारील परंडा, जामखेड आदी तालुक्यातील लोकांना याचा फायदा होईल. हुतात्मा एक्सप्रेसची जेऊर स्थानकावरील वेळ ही सर्वांना सोयीची आहे. त्यामुळे या गाडीला प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे. सबब रेल्वे प्रशासनाने त्वरित यावर निर्णय घेऊन तत्काळ थांबा देण्यात यावा, अन्यथा करमाळा तालुक्यातील महिला व इतर कार्यकर्ते यांचेसह उपोषण, धरणे आशा विविध मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.– ॲड सविता शिंदे
जेऊर रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांची आवक – जावक मोठ्या प्रमाणात असून गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे, लहान मुले, अपंग, स्त्रिया व वृद्धांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे त्यामुळे 12157-58 हुतात्मा इंटरसिटी या गाडीला तात्काळ जेऊर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा अन्यथा अमरण उपोषण करू.
– गौसिया शौकत शेख