यशस्वी ‘स्ट्रॉबेरी शेती’ करणाऱ्या वांगीचे शेतकरी विकास वाघमोडे यांचा सन्मान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील वांगी क्रमांक तीन येथे स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करून सात गुंठे क्षेत्रावर चार लाखाची उत्पन्न घेणाऱ्या विकास वाघमोडे यांचा कृषिरत्न आनंद कोठडीया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
स्ट्रॉबेरी म्हणले की, आपल्यापुढे समोर उभा राहतो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसर उन्हाळ्यातही थंड वातावरणात असलेल्या महाबळेश्वर मध्येच स्टॉबेरी शेती होऊ शकते, हा समज खोटा ठरला आहे, कारण करमाळा तालुक्यातील प्रतिकूल हवामानाही वांगी नं ३ येथील प्रगतशील शेतकरी विकास वाघमोडे यांनी स्ट्रॉबेरीचे यशस्वी पिक घेऊन त्याचे स्वतः मार्केटिंग करत सात गुंठे क्षेत्रावर चार लाख रुपये उत्पन्न मिळवत हा प्रयोग यश केला. श्री.वाघमोडे यांनी केलेल्या धाडस, जिद्द व कष्टाबद्ल त्यांचा सन्मान कृषीरत्नआनंद कोठडीया यांनी केला.
यावेळी जेऊर येथील प्रतिष्ठित व्यापारी प्रसन्न बलदोटा, सौ वर्षा कोठडीया प्रगतशील शेतकरी प्रशांत नाईकनवरे, गजेंद्र पोळ उपस्थित होते, यावेळी बोलताना कोठडीया म्हणाले की, करमाळा तालुक्यातील अनेक तरुण शेतकरी शेतीमधील नव्या वाटा निर्माण करत आहेत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे, वाघमोडे यांनी स्ट्रॉबेरी शेती करमाळा तालुक्यात यशस्वी होऊ शकते, याचे उदाहरण सिद्ध करून दाखवले आहे. भविष्यात या पिकाला चांगल्या संधी असून, तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत गट शेती पद्धतीने हे पीक घेतल्यास याचा नक्की फायदा होऊ शकेल अशा शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.