माजी मंत्री स्व दिगंबरराव बागल मामा जयंतीनिमित्ताने जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन - दिग्विजय बागल यांची माहिती.. - Saptahik Sandesh

माजी मंत्री स्व दिगंबरराव बागल मामा जयंतीनिमित्ताने जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन – दिग्विजय बागल यांची माहिती..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्याच्या सर्वच क्षेत्रामध्ये लोकनेते स्व.दिगंबररावजी बागल मामा यांच्या कार्याचा वेगळा ठसा व योगदान हे मोलाचे उल्लेखनीय असून प्रत्येक व्यक्तीशी त्यांचे जिव्हाळ्याचे व मैत्रीचे नाते होते. त्यामुळे येत्या 13 मार्च 2023 रोजी स्व. मामांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य कृषी प्रदर्शनामध्ये ‘आठवणीतले मामा’ हे स्व. मामांच्या दुर्मिळ व संस्मरणीय अशा छायाचित्राचे ‘अभिनव प्रदर्शन’ भरवणार असल्याची माहिती मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कृषी प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष दिग्विजय बागल यांनी दिली.

याबाबत बोलताना श्री बागल म्हणाले की, येत्या 13 मार्च रोजी लोकनेते माजी मंत्री स्व दिगंबरराव बागल मामा यांचे 68 वी जयंती आहे. त्या निमित्ताने 9 मार्च ते 13 मार्च 23 पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील एक भव्य कृषी प्रदर्शन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केले असून कृषीविषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन माहिती दिली जाणार असून विविध प्रकारचे 300 स्टॉल असणार आहेत.

सेंद्रिय शेती आयुर्वेदिक वनस्पतींची शेती आणि शेतीतील आधुनिक प्रयोग यांचंही या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल त्याचप्रमाणे खाद्यपदार्थांचे स्टॉल लहान मुलांसाठी खेळणी अशा प्रकारचे भव्य प्रदर्शन भरवले जाणार आहे. याच प्रदर्शनात तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री लोकनेते स्व बागल मामा यांच्या दुर्मिळ व संस्मरणीय अशा छायाचित्रांचे स्वतंत्र दालन उभा करणार असून ज्या ज्या व्यक्तींचा स्व मामांशी कामाच्या निमित्ताने विकास कामांची उद्घाघाटने वाढदिवस सत्कार समारंभ सुखदुःखाचे प्रसंग मैत्रीच्या नात्याने अशा कोणत्यातरी निमित्ताने आपण सर्वांचा संपर्क स्वर्गीय मामांशी आला असेल, त्या अनमोल अशा क्षणाचे एखादे तरी छायाचित्र म्हणजे फोटो आपल्याकडे नक्कीच असेल हेच फोटो जनतेने आमच्या जयंती समारंभ समितीकडे द्यावेत, समितीचे सदस्य आपणाकडून फॉर्म भरून घेतील हे सर्व फोटो निवड समितीकडून निवडलेल्या फोटोंचं प्रदर्शन आपण भरवणार आहोत.

यामध्ये स्व. मामांचा जीवन प्रवास आपल्याला उलगडून दाखवला जाईल, आपण दिलेले फोटो स्कॅन करून ते फोटो आपणाला जसेच्या तसे परत दिले जातील स्वर्गीय मामांनी राजकारणापलीकडे जाऊन एक मैत्रीचे वेगळे नाते निर्माण केले होते. स्वर्गीय मामांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण केले त्यामुळे राजकारणात स्वर्गीय मामांचे जरी कोणाशी मतभेद असले तर ते वैचारिक पातळीवर होते. कोणाशीही मनभेद कधीच नव्हते त्यामुळे विरोधक देखील आजही स्वर्गीय मामांचा नितांत आदर करतात मी व्यक्तिशः विरोधकांनाही स्वर्गीय मामांचा मुलगा या नात्याने विनम्रपणे राजकारण विरहित आवाहन करतो की, त्यांनी आपल्याकडील जतन करून ठेवलेला अनमोल क्षणांचा फोटो आम्हाला द्यावा मामांनी आपल्या हयातीत करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य दिन दुबळ्या व पददलित जनतेची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली. या फोटो प्रदर्शनाच्या निमित्ताने स्वर्गीय मामांच्या कार्याला व त्यांच्या आठवणींना नव्याने उजाळा देण्याचा आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

या प्रदर्शनाच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यासाठी राज्यातील मान्यवर मंत्री स्वर्गीय मामांचे जुने मित्र स्नेही हितचिंतक यांना सन्मानाने निमंत्रित केले जाणार असून त्यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. हा कार्यक्रम एलईडी स्क्रीन लेझर किरणांचा वापर आधुनिक साऊंड सिस्टिम संगणक प्रणालीचा वापर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्घाटन आणि समारोप सोहळा संपन्न केला जाणार आहे. त्याचबरोबर उद्घाघाटन समारंभात करमाळा विधानसभा कार्यक्षेत्रातील देशासाठी प्राण अर्पण केलेल्या शहीद जवानांच्या वारसांचा सन्मान सोहळा देखील आयोजित केला आहे.

शहीद जवानांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी आपण हा एक अभिनव कार्यक्रम घेत आहोत. त्याचबरोबर महिलांसाठी माहेर मेळावा हळदीकुंकू आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा आयोजन राहील यामध्ये विधवा महिलांचा देखील हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शालेय आणि महाविद्यालयीन मुला मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला महोत्सवाचे देखील आयोजन केले आहे.

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व त्या संदर्भातील आवश्यक त्या समित्या गठीत केल्या असून तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती शामलताई बागल व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल, या संपूर्ण महोत्सवाच्या मुख्य निमंत्रक असून या कार्यक्रमाची संकल्पना ही विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांची आहे. बागल गटाच्या नेत्या साखर संघ संचालिका रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली या अभिनव भव्य व नियोजनबद्ध कार्यक्रमाची तयारी व नियोजन सुरू असून तालुका व जिल्हा व तमाम राज्यातील जनतेने शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा व त्यानिमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. असे आवाहन शेवटी कृषी प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष दिग्विजय बागल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!