वीट येथे “प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग” योजना कार्यक्रम संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वीट (ता.करमाळा) येथे कृषी विभागामार्फत महिला बचत गटातील महिला व इतर महिला शेतकरी यांच्यासाठी PMFME (प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग) या योजनेचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या योजनेत महिला शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून स्वयंपूर्ण होण्यासाठी एक मोठी संधी आहे, त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाचे प्रमुख उमाकांत जाधव यांनी केले. याप्रसंगी अनेक शेतकरी महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे उमाकांत जाधव, बचत गटाच्या शितल भुजबळ, शीतल जाधव, अनिता ढेरे, मनीषा गनगे, सारिका जाधव, मनीषा गाडे, मनीषा पांढरे, रुपाली गनगे, वंदना सुरवसे, दिपाली निंबाळकर, सोनाली आवटे व इतर महिला शेतकरी उपस्थीत होत्या.
केंद्र शासनामार्फत आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना पुढील पाच वर्षापर्यंत संपूर्ण भारतभर राबविण्यात येणार आहे. यामध्ये शेतमाल प्रक्रिया आणि कृषी पूरक व्यवसाय यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. सर्वप्रथम या योजनेमध्ये एक जिल्हा एक उत्पादन असे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
यामध्ये रसवंती ग्रह, गुळ तयार करण्याचा छोटा उद्योग ,करडई, सूर्यफूल ,शेंगदाणा इत्यादीपासून तेल तयार करण्याचा तेलघाणा, मिरची पावडर, पापड तयार करणे, लोणचे तयार करणे, डाळमिल,ज्वारीचे विविध पदार्थ तयार करणे, तसेच गहू,तूर,मूग,उडीद, हरभरा ग्रेडिंग करून पॅकिंग करून ब्रँडिंग करून नजीकच्या मोठ्या शहरांमध्ये पाठवणे, इत्यादी प्रकारचे प्रक्रिया उद्योग या योजनेमध्ये करता येणार आहेत.
सदर योजना बँक कर्जाची निगडित आहे. यासाठी वैयक्तिक लाभार्थी, गट लाभार्थी, शेतकरी उत्पादक गट, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता गट उत्पादक, सहकारी संस्था यांना या योजनेमध्ये सहभाग घेता येतो वैयक्तिक लाभार्थींना पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के व कमाल दहा लाख मर्यादित अनुदान देय आहे, गटांना 35 टक्के अनुदान देय आहे, मार्केटिंग व ब्रँडिंग करिता गट लाभार्थींना पात्र प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान देण्यात येते. यावेळी कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत परसबाग योजनेतील भाजीपाला कीट चे वितरण करण्यात आले.