शेटफळचा 'पेरू' केरळच्या बाजारात - दोन‌ एकरात तेवीस लाखांचे उत्पन्न अपेक्षीत... - Saptahik Sandesh

शेटफळचा ‘पेरू’ केरळच्या बाजारात – दोन‌ एकरात तेवीस लाखांचे उत्पन्न अपेक्षीत…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शेटफळ ता करमाळा येथील दत्तात्रय लबडे या शेतकऱ्याच्या पेरूला केरळमधील बाजारपेठेत सध्या प्रतिकिलो 85 रुपये प्रमाणे दर मिळत आहे. यावर्षी त्यांना दोन एकर पेरू पिकापासून तेवीस लाखापेक्षा जादा रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे.

शेटफळ (ता.करमाळा) येथील शेतकरी आपल्या शेतीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग केलेले करताना दिसतात, येथील दत्तात्रय रामदास लबडे यांनी चार वर्षांपूर्वी आपल्या शेतामध्ये मध्यप्रदेशातील नर्सरीमधून रोपे आणून दोन एकर व्ही.एन.आर जातीच्या पेरूची लागवड केली आहे.

आतापर्यंत त्यांनी भरघोस उत्पादन मिळवत दोन पिके घेतली आहेत, सध्या त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या बागेतील पेरूची काढणी सुरू केली असून, दोन एकरामध्ये 20 टन पेरूची विक्री करत आतापर्यंत सरासरी सत्तर रूपयाचा दर मिळवत चौदा लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आणखी दहा टनापर्यंत उत्पादन अपेक्षित असून सध्या त्यांचा पेरूला केरळ येथील बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने ते एका व्यापाऱ्याच्या मध्यस्थीने पेरू केरळ येथील बाजारपेठेत पाठवत आहेत.

केरळला सध्या प्रतिकिलो 85 रुपये प्रमाणे दर मिळत आहे. या वर्षी त्यांना दोन एकर पेरू पिकापासून तेवीस लाखापेक्षा जादा रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. प्रगतशील बागातदार म्हणून ओळख असलेल्या दत्तात्रय लबडे यांनी आजपर्यंत आपल्या शेतात ऊस केळी कलिंगड शतावरी याचे भरघोस उत्पादन घेतले आहे सध्या गावातील शेतकरी गटशेतीच्या माध्यमातून केळीबरोबरच पेरू पिकाचाही प्रयोग करत आहेत.

आतापर्यंत पुणे मुंबई दिल्ली बाजारपेठेत या गावातील पेरू पाठवला जात होता परंतु लबडे यांनी प्रथमच यावर्षी केरळ राज्यांमध्ये आपला पेरू पाठवण्यास सुरुवात केली असून त्यांना दरही चांगला मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे .त्यांना या पिकाच्या संदर्भात पोपट मांजरे रोहित लबडे विजय लबडे यांचेबरोबरच इतर प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाले आहे.

पेरू बागेत केलेल्या योग्य नियोजनामुळे मिलीभग सारख्या रोगांपासून त्यांची बाग दुर ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे. फळ खराब होऊ नये म्हणून त्यांनी क्रॉप कव्हर व प्लॅस्टिक बॅगचा वापर केला आहे यामुळे कोणत्याही रोगापासून पेरूचे संरक्षण तर झालेच असून पिकाचा गुणवत्ता व दर्जा हे चांगला राखण्यात त्यांना यश मिळाले आहे सध्या त्यांची पेरू शेती या परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असून आपल्या शेतीमध्ये माहितीसाठी आलेल्या इतर शेतकऱ्यांना ते आवर्जून या पिकातील बारकावे समजावून सांगत सांगतात.


“माझ्या दोन एकर क्षेत्रामध्ये मी पेरूचे पीक घेतले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे उत्पादन चांगले मिळूनही माझ्यासह अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही यामुळे वेगळे पीक घेण्यात आपण चुकलो तर नाहीना अशी शंका येत होती मात्र यावर्षी दरही चांगला मिळत असल्याने जादा उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे”- दत्तात्रय लबडे (पेरू उत्पादक शेतकरी, शेटफळ ता.करमाळा )

Shetphal ‘Guava’ in Kerala market – Expected income of twenty three lakhs in two acres | Saptahik Sandesh News| Karmala Solapur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!