बापू तुम्ही अमर आहात!
प्रिय बापू,
प्रणाम |
सामान्य जीवनशैली आणि उच्च विचारप्रवर्तन शक्ती यामुळे तुम्ही माझेच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे आदर्श, प्रेरणास्थान आहात. ‘सत्य आणि अहिंसा यांचा स्विकार करावा,’ अशी जगाला दिलेली विचारसरणी बहुमूल्य आहे. आपण या जगाला सोडले पण बापू आज तुमच्या विचारशैलीने तुमचे नाव अमर झाले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात ‘महात्मा गांधी’ नावाचे सोनेरी पान लिहिलं गेलं. आज जगभरातल्या तत्त्वज्ञानात आपले तत्वज्ञान ‘गांधीवाद’ समाविष्ठ झाला. आपण दिलेली सुवचने केवळ मौखीक नव्हती तर ती तुम्ही स्वतः अनुभवली होती.
खरचं बापू ! ‘ माझ्या परवानगीशिवाय मला कुणी दुखावू शकत नाही.’ हे तुमचे वाक्य आजही दुखाच्या चिखलात पिचलेल्या माणसाला उभारी देते, अन्यायाखाली जगणाऱ्याला ताकद देते, हारलेल्याला जिंकण्याची प्रेरणा देते ” .’कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.’ असा सुखी, समाधानी आयुष्याचा मंत्र! बापू तुम्ही आम्हाला किती सहज समजावून गेलात. तुम्ही आम्हाला सोडून गेलात पण आजही त्या मंत्ररूपाने तुम्ही बापू अमर आहात..!
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल पण हृदय हवे असे सांगून गेलात पण जाताना आमचा हृदयात अमर झालात! ‘ जग बदलायचं असेल तर आधी स्वत:ला बदला.’ हे सांगून गेलात… खरचं बापू, तुम्हाला गाडीतून शुद्र म्हणून ढकलून देणारे गोरे इंग्रज आज तुमच्या या
शिकवणीमुळे आमच्या शेजारी खांद्यास खांदा देवून उभा आहेत. तुमच्या या उपदेशानं आज बापू संपूर्ण देश क्रांतीमय झालाय. तुम्ही दिलेली वचने आम्ही हृदयापासून मनापासून पाळतोय. स्वच्छता, सहकार्य, बंधुता, अहिंसा, सहिष्णुता आजही जपतोय ‘अहिंसा हे बलवानाचे शस्त्र आहे! आज त्या शस्त्राच्या ताकदीवर भारत आतंकवाद मिटवण्यास यशस्वी होत आहे. आपली नाविन्यपूर्ण ओळख भारत जगास करून देत आहे.
‘जे मुक्त करते ते ज्ञान.’ ज्ञानामुळे मानवाची विचारशक्ती आयुष्याच्या चौकटीपलीकडे जाण्यास सज्ज होते. शिक्षणाचा संबंध हा जिवंत अनुभवाशी आहे .ह्या आपल्या विचारांचा प्रभाव आजच्या शिक्षण पद्धतीत देखील दिसून येतो .नई तालीम, वर्धा शिक्षण, बुनियादी शिक्षण अशा ज्ञानग्रहणाच्या विविध वाटा तुम्ही आम्हाला दाखविल्या .याच वाटेवर चालणारा भारत आज महासत्ता बनण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे .हेड ,हॅन्ड अँड हार्ट सशक्त बनवणारी 3H शिक्षण पद्धतीची देणगी आम्हाला तुमच्यामुळे लाभली.
आदर्शवाद,निसर्गवाद आणि कार्यवादाचा सुंदर मिलाप म्हणजे गांधी प्रणित शिक्षण पद्धती !केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला मिळालेली बहुमोल देणगी आहे.
बापू हे सगळं यश पहायला तुम्ही हवं होत पण नियतीचा नियमचं ‘माळी झाडाचं पालन पोषण करतो, मात्र त्याची फळे पुढची पिढी चाखते’ बापू आम्ही नशिबवान आहोत. तुमच्या सारखा माळी या हिंदुस्थानाला लाभला म्हणून आज आम्हाला स्वातंत्र्याची फळे चाखायला मिळत आहेत. बापू आम्ही तुम्हाला वचन देतो, हे स्वातंत्र्य आम्ही नेहमी अबाधित ठेवू. कित्येक पिढ्या येतील- जातील पण बापू तुम्ही मात्र तुमच्या कार्यामुळे अमर आहात आणि असाल.
बापू तुमचे नाव कानी पडताच आमच्या ओठावर सहज शब्द उमटतात…
” दया, सहनशीलता कृतीत तुमच्या भासे .
विजयपथ राखले तुम्ही जरी रस्त्यात शेकडो फासे.”
✒️श्रीमती शकुंतला अरुण पालके उपशिक्षिका
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिटणे ता. बार्शी जि. सोलापूर मो.7719933390